Kolhapur School Girl Viral Video: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटासोबतच यामधील चंद्रा गाण्याने सर्वांना वेड लावले होते. या गाण्याचे असंख्य रिल्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले. सध्या अशाच एका चिमुकलीच्या डान्सने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
तिच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकरनेही तिच्या टॅलेंटचे कौतुक केले आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील (Viral Video) सत्य, चला जाणून घेवू..
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हर्षदा कांबळे या मुलीने यूट्यूबवर पाहून या गाण्यावर नृत्य केले आहे. हर्षदाच्या ठसकेबाज नृत्याचा व्हिडीओ खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही सोशल मीडियात शेअर केला आहे.
सहावीत शिकणाऱ्या हर्षदला नृत्याची खूप आवड आहे आणि ती अभ्यासातही तितकीच हुशार आहे. हर्षदाने चंद्रा गाण्यावर आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. तिने शाळेत केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हर्षदा हिचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यानचा आहे.
दिसला कशानं सख्या सजना, सांग लुकलुकणारा दिवा...’ या गाण्यावरील हर्षदाचे नृत्य पाहणाऱ्यांना सुरुवातीपासून खिळवून ठेवते. शाळेच्या गणवेशात केलेले ठसकेबाज नृत्य, चेहऱ्यावरील समर्पक हावभाव आणि देहबोली यांमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या नृत्याची आठवण होते. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला असून, त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी या चिमुकलीचे कौतुक केले आहे. तिची कला अचंबित करणारी असल्याचे सांगत ग्रामीण भागात टॅलेंटची काही कमी नसल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच चंद्रा गाण्यावर एका चिमुकल्याचा डान्स व्हायरल झाला होता. त्याचा व्हिडिओनेही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.