रणजीत माजगावकर
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसदराविषयीची आंदोलन आज पेटण्याची शक्यता आहे. ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्य सरकार, कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक फिस्कटल्यानंतर आज पुणे-बेंगलोर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच विविध गावातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.
काही कारखान्यांनी रक्कम देण्यास नकार दिल्याने मुंबई येथे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ऊसदर प्रश्नावरील बैठक निष्फळ ठरली. यानंतर आज पुणे-बेंगलोर महामार्ग अडवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.
दरम्यान, महामार्गावर शिरोली पुलाजवळ महामार्ग रोखण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनस्थळी दाखल होतील. त्यानुसार महामार्ग रोखण्याचे नियोजन आहे. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता असली तरी हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
मागील वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि पुढील वर्षी उसाला 3500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागण्यांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदार लक्ष देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आम्ही शेवटचं सांगितलं आहे की आम्हाला किमान 100 रुपये मिळाले पाहिजे. आता यापेक्षा एक रुपया कमी घेणार नाही. पण आता कसल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले तर आजच्या आंदोलनाबाबत विचार करू, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
काही साखर कारखाने कामगारांना आंदोलनाला पाठवत आहेत. म्हणजे शेतकरी आणि कामगार यांच्यात संघर्ष लावत आहेत. हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी कारखानदार यांना एकत्र केलं आहे. आम्ही सरकार आणि कारखानदार यांना निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू, काय व्हायचं ते होऊन जाऊद्या, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.