अक्षय शिंदे
जालना : जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल ४० कोटींचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी मागील आठवड्यामध्ये १० ग्राममहसूल अधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाने निलंबन केलं होतं. तर आता या प्रकरणात आणखी एक कारवाई करत ७ तलाठी व ५ तहसील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपीटमध्ये शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात आले होते. २०२२ ते २०२४ या कालावधीमध्ये बोगस शेतकरी दाखवून तसेच जमीन नसताना अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता. शिवाय दुबार अनुदान हडप केल्याच देखील समोर आले आहे. त्यानुसार चौकशी केली असता अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी 40 कोटी रुपये हडपले असल्याच उघडकीस आल आहे.
पुन्हा अकरा कर्मचारी निलंबित
शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात ७९ कोटींपैकी तब्बल ४० कोटींचा अपहार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या दहा ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात निलंबित केले आहे. यानंतर गुरुवारी पुन्हा ११ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एकूण २१ जणांना आजवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चौकशी सुरूच
प्रथमदर्शी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांची नावे या घोटाळ्यात समोर आली. मात्र सध्या ग्राम महसूल अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तसेच आता या प्रकरणात तहसील स्तरावरील अधिकारी, अव्वल कारकून, ऑपरेटर यांचेही नावे समोर येत आहे. त्यामुळे ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह इतरांवरही जिल्हा प्रशासन कारवाई कधी करणार ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. शिवाय याची चौकशी केली जात असून आणखी ५ तहसीलदारांचा देखील खुलासा मागवला आहे. यात ३५ तलाठ्यांची विभागीय स्तरावर चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.