शाहू महाराज ज्या विरोधात लढले, ती वृत्ती संपली आहे का; मुख्यमंत्र्यांचा सवाल

'छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया'
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

भूषण शिंदे -

कोल्हापूर : ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. छत्रपती शाहू महाराज हे महामानव होते. महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. असं वाटतं की, त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आज राज्याचं चित्र वेगळ असतं. पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाही तर समाज सुधारणेच्यादृष्टीने वेगळं चित्र असतं.

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे १०० व स्मृतीवर्ष साजरं करत आहोत. अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे. हा दूरदृष्टी असलेला राजा, आज या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांना अनेक राजे होऊन गेले. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे गादीवर बसलेले राजे नव्हते. या राजाने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला. याचा उल्लेख प्रबोधनाकारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले पाहिजेत, ते देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलं ते मार्गदर्शक आहे.

Uddhav Thackeray
संभाजी भिडेंना क्लीनचीट मिळाली म्हणू नका; गृहमंत्र्यांचं वक्तव्य

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असले पाहिजे हे वचन होतं. आज जी वृत्ती दिसते आहे त्याच्याविरोधातच शाहू महाराज लढले. आजोबांकडून जे ऐकले, मी वाचले त्यावरून दिसतं की छत्रपती शाहू महाराज कोणत्या व्यक्ती विरोधात नव्हते तर वृत्तीविरोधात होते. वंचित वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. शिक्षणातील भेदभाव दूर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतांना त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढं जाऊया, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं.

दरम्यान या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संबोधित केलं. ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारावर राज्य चालत असून प्रत्येक पिढीने शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक क्रांती घडली, असे अजित पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com