NCP Youth Congress : हिंगोलीमधील (hingoli) राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी येथील एका बडया नेत्यावर गंभीर आराेप करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना युवक अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत संबंधित नेत्यामुळं पक्षाचं नुकसान हाेत असल्याचे म्हटलं. दरम्यान संंबंधित नेत्यानं त्यांच्यावर केलेले आराेप फेटाळले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांनी पळवले आणि मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनमानी, पक्षाच्या विचारसरणीशी तडजोड करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत शिंदे वेगळे झाले. मात्र राज्याच्या राजकारणात घडलेल्या या घडामोडीचा परिणाम जिल्हास्तरावरील राजकारणात देखील होताना पाहायला मिळत आहे. हिंगोलीच्या राष्ट्रवादीमध्ये असाच काहीसा छोटा राजकीय भूकंप घडला आहे. याला कारण ठरलय हिंगोली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत राष्ट्रवादीचे बडे नेते व विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर केलेले गंभीर आरोप.
हिंगोली जिल्ह्याचे सद्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद असलेल्या दिलीप चव्हाण यांच्यावर पक्षात एकाधिकारशाही व मनमानीचा आरोप करण्यात येत आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलीप चव्हाण यांच्यावर हा जाहीर आरोप केला आहे. दिलीप चव्हाण हे पक्ष संघटन वाढविण्या ऐवजी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना राजकारणात धारातीर्थी पडत असल्याचा आरोप घुगे यांनी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या पाच वर्षांपासून आपण राष्ट्रवादीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहोत, पक्षासाठी अनेक आंदोलने केली, पक्ष वाढविण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी उभी केली, मात्र हे सर्व करत असताना दिलीप चव्हाण यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असून त्यांच्याकडून राजकारणात माझे खच्चीकरण होत असल्याचा आरोप घुगे यांनी केला आहे.
घुगे यांनी आरोप केलेले दिलीप चव्हाण हे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. हिंगोली पालिकेत नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळा त्यांनी पद भूषवल आहे ,सद्या चव्हाण यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळालेल्या दिलीप चव्हाण यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढविण्यासाठी कोणतीही भरीव कामगिरी केली नसल्याचा आरोप घुगे यांनी केला आहे. त्यासोबतच हिंगोली पालिकेत, पद भूषवताना दिलीप चव्हाण यांनी भाजप सोबत छुपी युती करत पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने याची गंभीर दखल घेऊन प्रदेशाध्यक्षांनी दिलीप चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील बालाजी घुगे यांनी केली आहे.
या सर्व आरोपांवर दिलीप चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले असून बालाजी घुगे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घुगे हे स्वतःच राष्ट्रवादीचे संघटन वाढविण्यासाठी कमी पडल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. वरिष्ठांच्या आदेशाने घेण्यात येणाऱ्या पक्षाच्या बैठकांना घुगे हे सतत अनुपस्थित राहत असल्याने त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर चुकीचे आरोप केल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.