Akola जिल्हा परिषदेत चौरंगी लढत; काँग्रेस स्वबळावर!

अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.
Akola जिल्हा परिषदेत चौरंगी लढत; काँग्रेस स्वबळावर!
Akola जिल्हा परिषदेत चौरंगी लढत; काँग्रेस स्वबळावर!SaamTvNews

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीतील तीन पक्षामध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेले तीन पक्ष स्थानिक निवडणुकीत मात्र वेगळे लढत आहेत. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती आहे. राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अधिक आरक्षण होत असल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त ठरविण्यात आल्या. त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत 5 ऑक्टोबरला मतदान व 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 14 रिक्त गटांसाठी, तर 28 पंचायत समितीच्या गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

राजकीय प्रचार मोहिमेला सुरुवात झाली असून नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पोटनिवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अनेक मोठ्या नेत्यांनी आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाऊ, असे वारंवार जाहीर केले. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. त्यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये उलटसुलट चर्चादेखील रंगली. अखेर काँग्रेस पक्षाने 'एकला चलो रे'ची भूमिका घेत स्वतंत्रपणे आपले उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

राज्यात सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष निवडणुका मात्र परस्परविरोधी लढत आहेत. त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेनुसार स्वबळावर पोटनिवडणूक लढण्यासाठी अकोला जिल्ह्यात काँग्रेसने सुरुवातीपासून हालचाली केल्या. काँग्रेसने अकोल्यातील 12 गटांमध्ये, तर 23 गणांमध्ये स्वतंत्रपणे आपले उमेदवार दिले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीने आघाडी केली. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात असून, त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अकोला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. प्रमुख पक्षांना निवडक मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Akola जिल्हा परिषदेत चौरंगी लढत; काँग्रेस स्वबळावर!
Breaking : नारायण ईंगळे अनाथ आरक्षणाचा पहिला अधिकारी

अशी आहे राजकीय पक्षांची तयारी -

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजप, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर आहे. दोन्ही पक्षांनी सर्व जागांसाठीचे उमेदवार जाहीर करून त्यांचे अर्जही वैध ठरले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि प्रहार जनशक्ती पक्ष्याची आघाडी आहे. तर, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी असून 9 जागांवर शिवसेना तर 5 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार आहे. कॉंग्रेसने स्वबळाचा नारा देत जि.प.साठी 14 पैकी 12, तर प.सं.साठी 28 पैकी 23 उमेदवारांची घाेषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने नेमक्या काँग्रेसला किती जागा मिळतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com