शिरपूर : प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर सोबत राहणे शक्य होणार नाही. यामुळे प्रेमीयुगलाने सावळदे (ता.शिरपूर) येथील पुलावरुन तापी नदीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पट्टीच्या पोहणार्यांनी युवतीला बाहेर काढल्याने ती वाचली. परंतु, युवकाचा मृत्यू झाला. तीन तासानंतर युवकाचा मृतदेह हाती लागला. (dhule-news-shirpur-love-couple-jumped-off-the-bridge-after-the-love-affair-was-revealed)
अमोल किशोर कोतकर (वय ३१, रा.वारूळ-पाष्टे ता. शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव आहे. अमोल याचे शिरपूर फाट्यावर आशापुरी स्पेअर पार्टसचे दुकान आहे. त्याचे दर्शना येवले (रा. नाशिक) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. दर्शनाचे माहेर मालेगाव (जि. नाशिक) येथील असून सासर नाशिक येथील आहे. दोघेही नातलग असून काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले.
प्रेमसंबंधाबाबत सासरच्यांना पडले माहिती
प्रेम फुलत गेल्याने त्याची कुणकूण दर्शनाच्या सासरच्या लोकांना लागली. त्यांनी चौकशी करुन अमोल कोतकरशी तिचे संबंध असल्याचे हुडकून काढले. यानंतर १५ ऑक्टोबरला तिला घेवून सासरचे कुटूंब धुळे येथे आले. अमोललाही बोलाविण्यात आले. तुमचे प्रेमसंबंध असतील तर घटस्फोट देऊन अमोलसोबत जा असे सासरच्या लोकांनी दर्शनाला सांगितले. मात्र तिच्या आईने घटस्फोटाला नकार दिला. अखेर दोन्ही बाजूंचे लोक नरडाणा येथे गेले. तेथे अमोलच्या कुटुंबाशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दर्शनाला घेऊन अमोल शिरपूरला निघून गेला.
हातात हात घेऊन उडी
यानंतर अमोल व दर्शना हे आत्महत्या करण्याच्या हेतूने सावळदे येथे पोहचले. तेथील पुलावर पोहचल्यावर त्यांनी बाहेरगावी जाऊन एकत्र राहू असा विचार केला. तेथून दोघेही परत शिरपूरला आले. मात्र दोघेही विवाहित असल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतील, त्यापेक्षा मरण बरे अशा विचाराने ते पुन्हा सावळदे येथे पोहचले. सकाळी नऊला दोघांनी हातात हात घेऊन पुलावरुन उडी टाकली.
अगोदर नदीत बुडालेल्याचा सुरू होता शोध अन्
नदीपात्रात सावळदे येथील पट्टीचे पोहणारे नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेत होते. त्यांच्यापासून काही अंतरावरच दोघे पाण्यात पडले. लागलीच धाव घेवून दर्शनाला जिवंत बाहेर काढले. मात्र अमोल उडी टाकल्यानंतर थेट तळाशी गेल्याने त्याचा शोध लागू शकला नाही. तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत यांनी मदतकार्य केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.