महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झाली आहे. त्यामुळे आता तेच मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झालंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री असा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री अशी शर्यत बरीच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाली. ४६ वर्षांत महाराष्ट्रात ९ नेते उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता आले नाही. त्या-त्या वेळची राजकीय गणितं त्याला कारणीभूत होती. पण देवेंद्र फडणवीसांनी सर्व सत्तासमीकरणं जुळवत हा एकप्रकारे रेकॉर्ड नोंदवला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. ते आता मुख्यमंत्री होत आहेत.
नाशिकराव तिरपुडे
१९७८ साली मुख्यमंत्रीपद वसंतदादा पाटील यांना मिळालं. तर नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. तिरपुडे हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. उपमुख्यमंत्रिपदावर तीनच महिने होते. शरद पवार यांच्या सरकारनंतर तिरपुडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. कारण नंतर ते काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात सक्रिय झाले. तेथे त्यांची महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९८३ साली तिरपुडे मुखमंत्री होतील, अशा चर्चा होत्या. पण तसं झालं नाही.
सुंदरराव सोळंके
शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद सुंदरराव सोळंके यांच्याकडे गेलं. मंत्रिमंडळातील समीकरणे जुळवून आणण्यासाठी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात आलं. सोळंके वर्षभराहून अधिक काळ या पदावर राहिले. मात्र, पवार यांचे सरकार पडल्यानंतर सोळंके यांनाही पद सोडावं लागलं. सुंदरराव हे परळी आणि बीडमधील मोठे नेते होते.
रामराव आदिक
१९८३ साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री हे पद रामराव आदिक यांच्या हाती सोपवलं. आदिक हे काँग्रेसचे मोठे नेते होते. तसेच ते प्रसिद्ध वकीलही होते. १९८५ साली ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. पण त्यावेळच्या सत्तासमीकरणानुसार त्यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचता आलं नाही.
गोपीनाथ मुंडे
१९९५ साली शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर भाजपला उपमुख्यमंत्रिपद मिळालं. भाजपकडून गोपीनाथ मुंडे तब्बल ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपदावर राहिले. १९९९ सालच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला.
आर आर पाटील
२००४ साली शरद पवार यांनी आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री केलं. पाटील हे सांगली जिल्ह्यातील ताकदीचे नेते होते. यासह शरद पवार यांचे विश्वासूही मानले जायचे. २००८ पर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
छगन भुजबळ
महाराष्ट्रात १९९९ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आणि सरकार स्थापन केलं. काँग्रेसला मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्राची धुरा छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली. महाराष्ट्राचे दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतरच्या आघाडी आणि आताच्या महायुती सरकारमध्येही ते मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
विजयसिंह मोहिते- पाटील
२००३ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे तगडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. २००४ पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते. २०१४ साली पाटील माढा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
अजित पवार
साधारण २०१० सालापासून अजित पवार आघाडी, महाविकास आघाडी ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाते. पण त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती आणि सत्तासमीकरणानुसार अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळालं नव्हतं. मात्र, हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी बदलून नव्याने घडवला आहे. उद्या, गुरुवारी ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.