पंढरपूर : आषाढी - कार्तिकीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल पावला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे निःसीम विठ्ठल भक्त आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा केली .
दरम्यान 2018 मध्ये मराठा आंदोलनामुळे त्यांना आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला (Pandharpur) येता आले नाही. त्यावेळी त्यांनी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली.
त्यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी देखील मीच शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येणार असा आत्मविश्वास ही व्यक्त केला होता. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळून देखील शिवसेनेने ऐनवेळी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांना संधी मिळाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावे लागले होते.
उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रथमच 2020 मध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. ठाकरे यांनी सलग दोन वर्षे मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली. तर ठाकरे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना दोन वेळा कार्तिकीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला.
अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांना अनपेक्षीत मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. मागील जून महिन्यात आषाढीची विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा प्रथमच मान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यानंतर आता कार्तिकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. उद्या पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे.
कार्तिकीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या पहाटे अडीच वाजता कार्तिकीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.
देवेंद्र फडणीस यांनी 2014 ते 2019 या काळात सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. या पाच वर्षामध्ये त्यांना चारवेळा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची महापूजा करण्याचा मान मिळाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकीची महापूजा करण्यासाठी ते प्रथमच पंढरपूरला येत आहेत.
मुख्यमंत्री म्हणून आषाढी आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी अशा दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. आषाढी - कार्तिकी या दोन्ही शासकीय महापूजा करण्याचा मान यापूर्वी कोणालाच मिळाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र याला एकमेवक अपवाद ठरले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलपावला अशीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.