आज कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज पहाटे २:३० वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली. वारकरी प्रतिनिधी म्हणून उदगीर येथील बाबुराव यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला. पण यंदा निवडणूकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. देवूठाणी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. याला विष्णु-प्रबोधिनी, देव प्रबोधिनी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिकी एकादशी असेही म्हणतात, जी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते.
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आज दशमीला जवळपास ५ ते ६ लाख भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गुलाब, अष्टर, झेंडू,मोगरा,गुलछडी यासह विविध पाना फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट विठ्ठल प्रवेश द्वार,चौखांबी,सोळखांबी आदी ठिकाणी करण्यात आली.
तसेच मंदिर समितीने विठ्ठल मंदिर आणि परिसरात रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग तीन किलोमीटर अंतरावर गेली आहे. दर्शनासाठी ६-७ तासांचा वेळ लागत आहे. कार्तिकीसाठी येणाऱ्या भाविकांना विक्रीसाठी ८ लाख बुंदीच्या लाडूचा प्रसाद बनवण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्या निमित्ताने पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकरी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
हरी नामाचा जयघोष आणि विठ्ठल नामाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. कार्तिक एकादशीचे चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागेचा तीर भाविकांनी फुलून गेला आहे. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात सुमारे पाच लाख भाविकांनी गर्दी केली आहे. शहरातील विविध भागात यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी १२० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत केले असून जवळपास १६०० पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आलेला आहे.
Written By: Dhanshri Shintre.