कोरोनाच्या लाटा येत राहतील, राज्यात शिवसेनेची लाट आली पाहिजे : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray SaamTvNews

मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने व सामना वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना बळ देण्याचा व विरोधकांकडून सातत्याने होत असणाऱ्या टीकांना उत्तर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी यावेळी केल्याचे दिसून आले.

दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनेचे लक्ष्य

आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे माझी प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगून उद्धव ठाकरेंनी आपल्या संवादास सुरुवात केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत. या लाटांप्रमाणेच देशभरात शिवसेनेच्या विचारांची लाट आली पाहिजे. आगामी काळात दिल्ली काबीज करण्याचं आपलं लक्ष्य असायला हवं कारण बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्याला दिल्ली जिंकायचं स्वप्न दिले आहे.

महाराष्ट्र पिंजून काढणार

राज्यभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा व लोकसभा निवडणुकांकडे बारकाईने लक्ष्य देतात त्याचप्रमाणे आता काम करण्याची, गावागावात पक्ष वाढवण्याची, पक्षाच्या सीमा विस्तारण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने आगामी काळात आपण स्वतः महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार

काळजीवाहू सरकार जसं असत त्याप्रमाणेच आपले विरोधक हे काळजीवाहू विरोधक असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली. तसेच या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेचं नुकसानचं झालं असून आमची २५ वर्षे युतीत सडली असल्याचे आजही माझे मत असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. वापरायचे आणि फेकून द्यायचे हि भाजपची जुनी नीती असून भाजपने नेहमीच प्रादेशिक पक्षांशी युती करून त्यांच्याशी विश्वासघातकी भूमिका घेतल्याचे ठाकरे म्हणाले.

भाजप म्हणजे हिंदुत्व नाही

उद्धव ठाकरे यांनी भाजपचा सडेतोड समाचार घेतल्याचे या संवादादरम्यान दिसून आले. युती तोडण्याचे कारण सांगताना आमची २५ वर्षे युतीत सडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला हिंदूंसाठी सत्ता हवी होती, सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर आम्ही केला नाही. बाबरीनंतरच शिवसेनेने पक्षाच्या सीमा वाढवल्या असत्या तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान दिसला असता असे मत ठाकरेंनी व्यक्त केले.

भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले

आगामी काळात महाराष्ट्र पिंजून काढणार असून काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार आहे. विरोधकांची काळजी नाही. आपणच त्यांना पोसलं २५ वर्षे युतीत सडली यावर ठाम, शिवसेनाप्रमुख म्हणायचे राजकारण हे गजकरण आहे. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले. आम्ही हिंदुत्व नाही सोडले आणि सोडणार देखील नाही, भाजपला सोडले म्हणून आम्ही हिंदुत्वविरोधी झाले नसून भाजप म्हणजे हिंदुत्व नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

अटलजींना शिवसेनेने सहकार्य केले

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला आव्हान देत एकट्याने लढा असे आव्हान दिले होते. आमची एकट्याने लढण्याची तयारी आहे. पण, आव्हान देऊन ईडी वगैरे ससेमिरा लावायचा हे असले उद्योग करू नका. एकेकाळी ह्याचे डिपाॅझिट जप्त व्हायचे. समता ममता सगळ्यांसमवेत भाजपने युती केली आणि दगाबाजी केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. अटलजींना देखील शिवसेनेचे सहकार्य केल्याचे ठाकरे म्हणाले.

सत्तेच्या माध्यमातून संस्थात्मक काम वाढवा

ज्या पद्धतीने राज्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षांचे ग्रामीण व शहरी भागात संस्थात्मक जाळे आहे. ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपला मतदार बांधून ठेवला आहे. शिवसेनेने देखील आता सत्तेच्या माध्यमातून त्याच पद्धतीचे संस्थात्मक काम वाढवण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी बँकांच्या निवडणूका, विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका जिंकायच्या म्हणजे जिंकायच्याच असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत केला. यावेळी राज्यभरातील शिवसेना नेते, पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com