Savitribai Phule Jayanti : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यामुळे हीच आपली दैवत असून त्यांचे विचार समाजात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सातारा जिल्ह्यात केले. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव (जि.सातारा) येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी भेट देत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
छगन भुजबळ यांच्या हस्ते आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सावता माळी समाज मंदिर बाजारपेठ येथे महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी भुजबळ बाेलत हाेते.
छगन भुजबळ म्हणाले हजारो वर्ष बहुजन समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता. तत्कालीन व्यवस्थेकडून त्यांच्यावर अनेक अन्याय व अत्याचार झाले. महिलांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हते अगदी ब्राम्हण समाजातील महिलाना देखील कुठलेही स्वातंत्र्य नव्हते. त्या काळात महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यांना समाजात महत्वाचे स्थान निर्माण करून दिले.
त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांचे हेच कार्य पुढे छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी पुढे नेले. त्यामुळे आज महिलांना समाजात महत्वाच स्थान मिळालं आहे. त्यामुळे हीच आपली खरी दैवत असून त्यांच्या विचार समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच या महापुरुषांचे पूजन नियमित होण्यासाठी या महापुरुषांचे पुतळे उभे करा. त्याची नियमित पूजा करा हेच स्मारके व पुतळे समाजातील प्रत्येक घटकाला कायम प्रेरणा देत राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार मकरंद पाटील, अध्यक्ष विशाल राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी सभापती राजेंद्र तांबे, नितीन भरगुडे पाटील, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, माजी सरपंच छाया जाधव, लक्ष्मी पानसरे, सुनील देशमुख, दिलीप गुंजवटे, अनुप सूर्यवंशी, प्रदीप माने, सचिन राऊत, महेश जाधव यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव (जि.सातारा) येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. त्यावेळी सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकारमंत्री अतुल सावे, ज्येष्ठ नेेते आमदार छगन भुजबळ व मान्यवर उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.