नाशिक : विधानसभेसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात यात्रा सुरु केली आहे. नाशिकमध्येही जरांगे यांचा यात्रेनिमित्त सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधानसभेत जिंकून येण्याचे आव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांच्या खुल्या आव्हानाला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ यांनी मतदारसंघ जाहीर करत निवडणुकीत जिंकून येणार असल्याचाही दावा केला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी विरोधकांसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवरही मोठं भाष्य केलं. 'मी येवला लासलगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहे. मी मोठे मताधिक्य घेऊन निवडून येणार, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
नारपार प्रकल्पावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, 'नारपार नदी प्रकल्प मी विरोधीपक्ष नेता असताना मांडला. गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी पैसे लागतो. मराठवाड्याला पाणी द्यायचे असेल, तर हा प्रकल्प महत्वाचा आहे. ज्या राज्यात पाऊस पडतो ते पाणी त्या राज्याचे आहे. केंद्र सरकारने मदत नाही केली नाही, तो भाग वेगळा आहे. आम्ही पैसे खर्च करून तो प्रकल्प करणार आहे'.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लांबणीवर जाणार आहे. यावरही छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं. 'मागील विधानसभा निवडणुकीत सरकार लवकर स्थापन झाले नाही. त्यामुळे कार्यकाळ संपायला उशीर आहे. सरकार उशिरा स्थापन झाले होते. त्यामुळे त्यानुसार निवडणुका होतील, असे भुजबळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, 'विरोधकांचं काम टीका करणे आहे. 70 लाख महिलांना पैसे पोहचले आहे. १ कोटीहून अधिक महिलांचे फॉर्म स्वीकारले आहेत. तांत्रिक अडचणी आहेत. ते दूर करण्याचे काम सुरू आहे. बँकांच्या तक्रारीबाबत माहिती नाही. आम्ही महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये दिले आहेत'.
यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक-मुंबई महामार्गावरही भाष्य केलं. 'मला २० ते २५ टक्के फरक जाणवत आहे. काम सुरू आहे. अजून गती घेण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.