संजय जाधव, बुलढाणा|ता. २२ ऑगस्ट २०२४
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली आहे.
राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो याचे प्रात्यक्षिक दाखवणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. नागपूर येथे २० ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पोलिसांनी तुपकरांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेतली असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता आपण आंदोलन करू नये असे सांगत पोलिसांनी कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सदरची नोटीस बजावली असून आंदोलन करू नये असे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा दिला आहे.
दरम्यान, अशा नोटीसला आणि पोलीस कारवाईला आपण घाबरत नाही. अशा नोटिसांनी घरातील कपाट भरले आहे. पोलीस कारवाईचा धाक दाखवून सत्ताधारी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जीव गेला तरी आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करतच राहणार, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी जाहीर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.