औरंगाबाद : राज्यातील प्राध्यापक, प्राचार्य पदासाठी पात्र असलेल्या आणि प्राध्यापक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारच्या वतीनं पडलंय. राज्यातील प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली. त्या ट्वीटमध्ये 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.' असा मजकूर टाकलाय.
त्यामुळे पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्या सेट-नेट आणि पीएचडी धारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जून २०२१ मध्ये प्राध्यापक भरती केली जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र, त्याबाबत कुठलेही पाऊल सरकारने टाकले नव्हते. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्राध्यापक भरती केली जाईल, असंही सांगितलं गेलं. मात्र, अद्यापपर्यंत भरती बाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यभरातील पात्रताधारक आतुरतेने वाट पाहत आहेत.
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्याशिवाय राज्यभरात सेट-नेट आणि पीएचडी केलेले हजारो पात्रताधारक नोकरीची वाट पाहत आहेत. अशात प्राध्यापक भरतीला मुहुर्त लागावा अशी अपेक्षा आहे. आता पहिल्या टप्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आल्यानं त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष भरती प्रक्रिया पूर्ण कधी होते याची वाट आता पात्रताधारक पाहत आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.