संभाजी भिडे, एकबोटेंना तुम्ही ओळखता का? शरद पवार म्हणाले...

Shard Pawar : नेमके आयोगाकडून शरद पवार यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर शरद पवारांनी काय उत्तरे दिली? पाहा...
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv
Published On

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज, गुरुवारी भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी (Bhima Koregaon Case) आयोगासमोर आपली साक्ष नोंदवली. आयोगाकडून ५ आणि ६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी शरद पवारांना तिसरं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर हजर झाले. भीमा-कोरेगाव (Bhima Koregan) येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर शरद पवार यांनी साक्ष नोंदवली.

Sharad Pawar
'हनुमान चालीसा म्हणा'; कालीचरण महाराज म्हणाला पाठ नाही, मी तर...

दरम्यान, आयोगासमोर हजर होताच वकील आशिष सातपुते यांनी शरद पवार यांना भीमा-कोरेगाव हिंसाचाराबाबत काही प्रश्न विचारले. आयोगाच्या या प्रश्नांना शरद पवार यांनी उत्तरे दिली आहेत. नेमके आयोगाकडून शरद पवार यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर शरद पवारांनी काय उत्तरे दिली? पाहूयात....

पहिला प्रश्न - एखाद्या वक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेच नुकसान होतं तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची असते?

शरद पवारांचं उत्तर - लोकप्रतिनिधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नयेत, जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल.

दुसरा प्रश्न - कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात?

शरद पवारांचं उत्तर - अशा सभांना जागा देताना त्यामुळे सर्वसामांन्य लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणतीही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

तिसरा प्रश्न - तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतूदींच्या आधारे आहे?, वकिलांचा सवाल

शरद पवारांचं उत्तर - आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे. जर माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर ते जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम 124 A हे ब्रिटीश कालीन आहे. मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीनं होताना दिसतोय. तो थांबायला हवा असं मला वाटत.

Sharad Pawar
कळव्यातील मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे कौतुक; स्वतः उतरवले मशिदीवरील भोंगे

चौथा प्रश्न - तुम्ही ही गोष्ट एक राज्यसभा सदस्य या नात्यानं संसदेतही मांडू शकता, मग तिथं हे का मांडत नाही?

शरद पवारांचं उत्तर - होय, बरोबर आहे, मला वाटतं जेव्हा मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी तिथंही या गोष्टी मांडेन.

पाचवा प्रश्व - गंभीर गुन्ह्याची माहिती गोळा करत असतात. पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे? माहिती मिळाली की कारवाई करावी? की माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या सूचनांची वाट पाहावी.

शरद पवारांचं उत्तर - पोलीस नियमावलीनुसार पोलीस दलाला थेट कारवाई करण्याचे मार्गदर्शक तत्व दिले आहेत. त्या आधारे त्यांनी कारवाई करावी.

सहावा प्रश्न - प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला, त्याचे तीव्र पडसाद उमटले, मालमत्तेचं बरंच नुकसान झालं?, याची जबाबदारी कोणाची?

शरद पवारांचं उत्तर - मला याबाबत काही बोलायचं नाही. इतर कुणी काय भूमिका घेतली, कार्यक्रम घेतले. त्याचे काय परिणाम झाले, ह्यात जायची मला आवश्यकता वाटत नाही

सातवा प्रश्न - जबाब नोंदवण्यासाठी आयोगाने अनेक राजकीय नेत्यांना बोलावलं होतं. आता देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांनाही आयोगाने बोलावलं पाहिजे का?

शरद पवारांचं उत्तर - हा आयोगाचा प्रश्न आहे. त्यांनी ठरवावं कुणाचा जबाब नोंदवायचा आहे आणि कुणाचा नाही.

आयोगाचे प्रश्न संपले आता प्रतिवाद्यांचे वकील बनसोडे हे शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.

पहिला प्रश्न - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुमचं घर हे केंद्रस्थानी होतं?

शरद पवारांचं उत्तर - मी केवळ भीमा कोरेगावसाठी आलोय. मी त्यावेळी 16 वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं जुनं मला काही आठवत नाही.

प्रश्न दुसरा - भिडे आणि एकबोटे यांना ओळखता का?

शरद पवारांचं उत्तर - वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी वाचले आहे. पण कधी त्यांना प्रत्यक्षात भेटलो नाही.

प्रश्न तिसरा - त्यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वळू बुद्रुक इथं एक ट्रस्ट बनवलीय याची तुम्हाला माहितीय का?

शरद पवारांचं उत्तर - मला माहिती नाही.

प्रश्न चौथा - भीमा कोरेगाव दंगल झाली हे केव्हा कळालं?

शरद पवारांचं उत्तर - दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत वृत्त आलं. त्यातून दंगल झाली हे कळालं.

पाचवा प्रश्न - तुम्ही महाराष्ट्र सरकार, प्रशासन यांना ही घटना झाल्यावर काही सूचना दिल्या का?

शरद पवारांचं उत्तर - जेव्हा हा आयोग नेमला गेला तेव्हा मला नोटीस आली की, याप्रकरणी सूचना द्याव्यात. मी माझ्या प्रतिज्ञापत्रात सूचना दिल्या आहेत.

सहावा प्रश्न - एल्गार परिषद बाबत तुम्ही काय बोलले?

शरद पवारांचं उत्तर - एल्गार परिषदेला जे हजर नव्हते त्यांच्यावर केस झाल्या. हे मी केलेलं विधान आहे.

सातवा प्रश्न - एल्गार तपास करा, पुन्हा SIT नेमा, तुम्ही तेव्हा मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

शरद पवारांचं उत्तर - खरं आहे, मी भूमिका घेतली होती की, एल्गार परिषद बाबत SIT नेमावी. जस्टिस सावंत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषद झाली त्यांना वादात खेचलं गेलं होतं. पण ते तिथे आले नव्हते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com