अहमदनगर : डिग्रस येथे एका घरात घुसून, पिस्तुलाचा धाक दाखवून दोन मुलांना ओलिस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना थोडीशीही चूक घडली असती, तर अघटित घडू शकले असते. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी झटापटीत मिटके बालंबाल बचावले, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सांगितले.
राहुरी कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे उपस्थित होते. B.G. Shekhar told the story of the attack in Rahuri
पाटील म्हणाले, की आरोपी सुनील लोखंडे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक आहे. त्याच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याला पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. त्यानंतर त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
डिग्रस येथे एका घरात आरोपीने सकाळी प्रवेश करून, दोन मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून ओलिस ठेवले. त्याला ताब्यात घेताना पोलिस उपअधीक्षक मिटके व पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी बोलण्यात गुंतविले. त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस अटक करतील, असे लक्षात आल्याने आरोपीने पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्यावर गावठी पिस्तूल रोखले. मिटके यांनी आरोपीचा हात पकडला. या झटापटीत पिस्तुलातून एक गोळी सुटली. मात्र, त्यातून मिटके बालंबाल बचावले, असे त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी, आरोपीने घरातील महिला व तिच्या पतीला धाक दाखविण्यासाठी एकदा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, एक पिस्तूल व काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आरोपीने पीडित महिलेची सोशल मीडियातून बदनामी केली होती. मागील आठवड्यात पीडितेने आरोपीविरुद्ध विनयभंग, खंडणी, अपहरण व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला होता, असे ते म्हणाले.
आरोपी खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरला होता. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म ॲक्ट, ओलिस ठेवणे, असे गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू आहे, असेही शेखर पाटील यांनी सांगितले.B.G. Shekhar told the story of the attack in Rahuri
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.