‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील. यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिंनीना आश्वस्त केले.
साक्री तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला पांझरा - कान सहकारी साखर कारखाना तसेच पंडीत दीनदयाळ उपाध्याय सूत गिरणी सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
धुळे जिल्ह्यातील भाडणे (ता. साक्री) येथे आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भाडणे (ता.साक्री) येथील नवीन १०० खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या इमारतीचे ई - भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, आमदार किशोर दराडे, आमश्या पाडवी, जयकुमार रावल, मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणी या खान्देशी बोलीतून भाषणाला सुरुवात करत महिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, "आठे जमेल शेतस् त्या समदा ताईसले मना नमस्कार.. तुमनाकरता ह्या भाऊ नी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण हाई योजना आणेल शे...तुमी अर्ज कया ना...आते रक्षाबंधन ना पहले तुमना खाता मा ओवाळणी जमा होणार शे.."
मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा महाविराट म्हणावा असा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे. कुणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो - करोडो बहिणी आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन एक महिना झाला आहे. सुमारे दीड कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे. ही योजना बंद होण्यासाठी सुरु केलेली नाही. ती पुढेही कायम सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन आमची पाठ थोपटली आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शासनाने गरीब घरातल्या मुलींना लखपती करणारी 'लेक लाडकी योजना' सुरू केली. यात मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे. २५ लाख लखपती दीदी शासन तयार करत आहे. आतापर्यंत १५ लाख लखपती दीदी झाल्या आहेत. महिलांना स्वत: त्यांच्या पायावर उभे राहाता यावे यासाठी म्हणून पिंक रिक्षा देण्यात येत आहे. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.