
Beed News : बीड जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. खो-खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. प्रियंका बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळंब अंबा गावची आहे. ती नुकतीच पुण्यात क्रीडा अधिकारीपदावर रुजू झाली आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने प्रियंकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिल्लीमध्ये १३ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत खो-खो विश्वकप स्पर्धा होणार आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. यात मुलींच्या खो-खो संघाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे या तरुणीची निवड झाली आहे. बीड जिल्ह्यातून खो-खो स्पर्धेतील कर्णधारपदी निवड होणारी प्रियंका पहिलीच मुलगी आहे.
प्रियंकाचे वडील हनुमान इंगळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "प्रियंका वयाच्या पंधराव्या वर्षापासून खो-खो खेळते. तिने आतापर्यंत २३ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असे पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत. विश्वकप स्पर्धेत कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे, वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो."
प्रियंका खूप जिद्दी आहे. लहानपणापासून तिला खो-खो खेळाची आवड आहे. तिला याच खेळात करिअर घडवायचे असे तिने ठरवले होते. तिच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. देशाच्या संघात कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल आम्हाला तिचा खूप-खूप अभिमान वाटतो, असे प्रियंकाची आई सविता इंगळे यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.