चेतन व्यास, प्रतिनिधी
शिक्षणाची गोडी असेल तर एका विद्यार्थ्यालाही शिक्षक शिकवायला तयार होत असतात. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. विद्यार्थीही एक अन् शिक्षकही एकच. इथे शाळेची घंटा एका मुलीसाठी वाजते. संपूर्ण गावात एकच शाळा असून शिक्षक आणि एकच विद्यार्थिनी आहे. वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील इंदरमारीमधील ही शाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
वर्धा जिल्ह्याच्या (Wardha) आष्टी तालुक्यातील इंदरमारी या गावात एक जिल्हा परिषदेची शाळा भरते. पाचवीपर्यंत असलेली ही शाळा सध्या चर्चेत आहे. कारण एकच शिक्षक अन् एकच विद्यार्थिनी या शाळेत नियमित उपस्थित असतात. एकाच विद्यार्थिनीसाठी ही शाळा नियमित भरते अन् वेळेत सुटते.
तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या वेदिका राजेंद्र कोकाटे या एका विद्यार्थिनीसाठी ही शाळा भरविली जाते. या विद्यार्थिनीसाठी शाळेत असणारे एकमेव शिक्षक शरद गणोरकर दररोज स्वतः शाळेची घंटा वाजवतात, राष्ट्रगीत घेतात आणि या वेदीकाला शिकवतात. शाळेत दोघेच असताना पण कधीही शाळा बंद राहत नाही. नियमानुसार दररोज वेळेवर शाळा सुरु होते आणि वेळेवर बंद होते.
इंदरमारी या गावाची लोकसंख्या ही केवळ 75 आहे. 1970 पासून गावात पहिली ते पाचवी अशी झेडपीची शाळा. शाळेत दोन वर्गखोल्या आहेत. यात एक खोली अंगणवाडीला देण्यात आली आहे. गावात एकूण 18 कुटुंबे वास्तव्यास असून शून्य ते आठ वर्षे वयोगटातील वेदिका ही एकमेव विद्यार्थिनी आहे.
नऊ वर्षे वयोगटातील मुले पुढील शिक्षणाकरिता तळेगाव येथील शाळेत जातात. या गावात अंगणवाडी असून त्या अंगणवाडीत एकही मूल दाखल नाही. शिक्षणाच्या प्रसारापासून एकही मूल वंचित राहू नये असे सरकारचे धोरण असते. त्याचे तंतोतंत पालन वर्धा जिल्ह्यातील या शाळेत होत असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.