खळबळजनक! गुप्तधनासाठी मायलेकींनी सरकारी वकील असल्याचं सांगत केला जादूटोणा

तुमच्या घरात गुप्तधन असून भुताचा वावर आहे, ते काढावे लागेल, अन्यथा पुत्रवियोग होईल अशी भीती व गुप्त धनाचे आमिष दाखवून दोन महिलांना पावणेतीन लाखांना लुबाडले आहे.
Shivajinagar Police Station, Beed
Shivajinagar Police Station, Beedविनोद जिरे
Published On

बीड - पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोण्याच्या प्रकाराने, पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तुमच्या घरात गुप्तधन असून भुताचा वावर आहे, ते काढावे लागेल, अन्यथा पुत्रवियोग होईल अशी भीती व गुप्त धनाचे आमिष दाखवून दोन महिलांना पावणेतीन लाखांना लुबाडले आहे. ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना बीड (Beed) शहरातील बालेपीर भागात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी वकील असल्याचे सांगून आरोपी महिलांनी दोन महिलांना जाळ्यात ओढले. नाजिया शेख आणि हुदा शेख असे या दोन्ही आरोपीचे नाव आहे.

याविषयी तक्रारदार असणाऱ्या सालिया इसाक शेख यांच्या फिर्यादीवरून, त्या गल्लीतील मैत्रीण जरिना पठाण यांच्यासमवेत 2 महिन्यांपूर्वी, बीड शहरातील अंबिक चौक भागातील HDFC बँकेत कामानिमित्त गेल्या होत्या. तेथे आरोपी नाजिया शेख या महिलेशी त्यांची ओळख झाली.

या भेटीत तिने पत्ता विचारून फिर्यादीची मैत्रीण जरिना यांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी अचानक आरोपी नाजिया शेख व तिची मुलगी हुदा शेख या दोघी फिर्यादी सालिया शेख यांच्या घरी आल्या. सालिया यांनी ओळखत नसल्याचे सांगितल्यावर बँकेतील भेटीचा संदर्भ दिला.

विशेष म्हणजे यावेळी तिने आपण सरकारी वकील असल्याचेही सांगितले. त्यानंतर नाजियाने तुमच्या घरात गुप्तधन असून ते काढावे लागेल, तुमच्याकडे भुताचा वावर आहे. त्यानेच मला इथपर्यंत आणले आहे. त्यामुळं गुप्तधन काढावे लागेल, अन्यथा दोन महिन्यांत पुत्रवियोग होऊ शकतो, असे तिने सांगितले. त्यामुळे सालिया शेख घाबरून गेल्या.

हे देखील पाहा -

एवढंच नाही तर पुत्रवियोगाचे विघ्न दूर करण्यासाठी 11 बोकडांचा बळी द्यावा लागेल. त्याचबरोबर घरातील सर्व दागिने एका भांड्यात टाकायला टाका व बोकडांच्या बळीसाठी 1 लाख 20 हजार रुपये लागतील. असे सांगून रोख 60 हजार रुपये व 96 हजार रुपये किमतीचे 32 ग्रॅम दागिने घेतले.

तर जरीना पठाण यांना गुप्तधनात हिस्सा देण्याचे आमिष दाखवून, रोख 60 हजार रुपये व 60 हजार रुपयांचे 20 ग्रॅम दागिने घेतले. हे दागिने एका भांड्यात ठेवण्याचे नाटक करून, त्यावर एक प्लेट झाकून ठेवली व तो लिंबाच्या झाडाखाली पुरला. या भांड्याला कोणी हात लावला तर पुत्रवियोग होईल, अशी भीती घालून तिने 2 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज उकळला. याप्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी मायलेकींवर फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आला प्रकार उघड

दरम्यान, सालीया शेख यांच्या मुलाने घरातील पैशाबद्दल मुलाने विचारल्यावर सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मुलासह सालिया यांनी लिंबाच्या झाडाखाली पुरून ठेवलेले भांडे काढले असता ते रिकामे आढळले. त्यावरून फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर ठाण्यात धाव घेत आपली कैफियत मांडली.

Shivajinagar Police Station, Beed
लातूरात सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक; महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत माय-लेक अगोदरचं अटकेत

दरम्यान जुलै महिन्याच्या अखेरीस साडेपाच तोळे, सोने 40 दिवसांत दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून आरोपी नाजीयाने बीड शहरातील इस्लामपुरा येथे एका महिलेकडून दागिने व 50 हजार रुपये उकळले होते. यावरून बीडच्या पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात नाजिया शेखला 27 ऑगस्ट रोजी अटक झाली असून तिला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्याचबरोबर एका महिलेला वकील असल्याचा बहाणा करून कोर्टात नोकरीचे आमिष दाखवत सव्वा दोन लाखांना गंडविल्याचे प्रकरण उजेडात आले. यावरून नाजिया शेख व मुलगा आबेद अरबाज यांच्यावर बीड शहर ठाण्यात 20 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला. यात मुलगा आबेद अटकेत आहे.

सव्वा महिन्यात तीन गुन्हे

आरोपी शेख नाजिया हिने सरकारी वकील असल्याची थाप मारून, वेगवेगळी शक्कल लढवत अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यात तिच्यावर हा तिसरा गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे किंवा कलबुर्गी असतील यांनी आपल्या जीवाची आहुती दिली. मात्र त्याच पुरोगामी महाराष्ट्रात जादू टोण्याची भीती दाखवून, लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी, सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकातील अंधश्रद्धा विषयीची भीती कधी दूर होणार ? हा देखील खरा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com