संजय राठोड
यवतमाळ : बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, असा मेसेज यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36 तासात स्टिंग ऑपरेशन करत 15 दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.
बेटी फाऊंडेशन संस्थेने 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे, असा संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला होता. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक सदर संस्थेला फोन केला. तसेच महिला आणि बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली.
हे देखील पहा-
त्यानंतर यवतमाळ आणि अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डमी पालक म्हणून विक्री करणाऱ्या संस्थेला बाळ विकत घेण्याची योजना आखली. त्यानुसार अवैध बाळ दत्तक आणि विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या 15 दिवसाच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याययंत्रणेद्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच संबंधित बाळाचे आई- वडील, आणि यामध्ये सहभागी बेटी फाउंडेशनच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच बाळाला ताब्यात घेण्यात आले असून बालसभागृहात ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा, पोलीस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे.
कारवाई दरम्यान यवतमाळ बाल कल्याण समिती अध्यक्ष एडव्होकेट सुनील घोडेस्वार, जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, रविंद्र गजभिये महिला आणि बाल विकास कर्मचारी, ठाणेदार सर्व पोलीस टीम उपस्थित होती. या कारवाईसाठी कार्यक्रम व्यवस्थापक, बिरसिस मॅडम, जिमबा मरसाळे आणि ज्योती कडू यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.