औरंगाबाद : राज्यात एकीकडे मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) तडाखा सुरु असतानाच दुसरीकडे पैशांच्या पावसाचं प्रकरणही गाजलं आहे. पावसाच्या संततधारेमुळं राज्यात अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका भोंदूबाबने गोव्यातील वृद्ध महिलेसह दोघांना चक्क पैशांचा पाऊस (Money fraud crime) पाडणार असल्याचं आमिष दाखवलं. मुसळधार पाऊस कोसळत असतानाच गोव्यातील वृद्ध महिलेच्या पदरी पैशांच्या पावसाच्या सरीही पडल्या नाहीत. भोंदुबाबाच्या टोळीने या महिलेसह दोन जणांना तब्बल १२ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी (three culprit arrested) तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूबाबा कैलास रामदास सोळुंके, त्याचा शिर्डीतील साथीदार गोरख साहेबराव पवार आणि औरंगाबाद शहरातील प्रमोद दिपक कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आणलेल्या ६० हजार रुपयांच्या पाचशेच्या नोटा जप्त केल्या आहेत.
औरंगाबादचे क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणपत दराडे यांनी दिलेली माहिती अशी की, पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून गोव्यातील एका वृध्द महिलेसह दोघांना १२ लाख रुपयांना भोंदूबाबा कैलास रामदास सोळुंके, गोरख साहेबराव पवार आणि प्रमोद दिपक कांबळे गंडा घातला. याप्रकरणी या तीन आरोपींना अटक केली आहे. औरंगाबाद शहरातील पडेगाव इथं राहणाऱ्या जावेद खान नुर खान यांची गोव्यातील पुष्पा बाळगो गाडेकर यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर १५ जून रोजी पुष्पा गाडेकर आणि महेश प्रसाद निपाणीकर जावेद खान यांच्या घरी आले होते.त्यावेळी त्यांची ओळख आरोपी प्रमोद कांबळे याच्याशी झाली.एक मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या रक्कमेच्या दुप्पट पैसे आपल्याला देतो, असे कांबळेने सांगितले होते. कांबळेच्या सांगण्यावर या तिघांनी विश्वास ठेवला. त्यानंतर प्रमोद कांबळेने मांत्रिकाची भेट घालून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतले.
१६ जून रोजी कांबळेने आरोपी भोंदूबाबा कैलास साळुंकेची तिघांसोबत भेट करुन दिली. त्यानंतर भोंदूबाबा कैलास साळुंके यांनी पैशांचा पावसासाठी विधीवत पूजा करण्यासाठी बोकड लागेल, असे सांगून सात हजार रुपये घेतले. १७ जून रोजी भोंदूबाबाने तिघांना वाळुज येथे बोलावून पैशांचा पाऊस दाखवतो, असे सांगत विधीवत पुजेचे सामान, सोने खरेदी आणि नोटांचा पाऊस पाडण्यासाठी ११ लाख ६२ हजार रुपये घेतले. त्यानंतर पैठण तालुक्यातील शेकटा येथे एका नातेवाईकाच्या घरी पूजा करुन अंधारात बॅटरीच्या उजेडात पैशांचे बंडल दाखवले.
त्यानंतर या तिघांचा भोंदूबाबा नोटांचा पाऊस पाडतो यावर विश्वास बसला. ३० जून रोजी आरोपी भोंदूबाबाने तिघांना शिर्डी येथे त्याच्या बहिणीच्या घरी नेले. आरोपीचा मेहुणा गोरख पवार याने त्याच्या घराच्या शेजारी पुजा मांडली. तेथेही अंधारात बॅटरीच्या उजेडात आरोपी साळुंके योन पैशाचा पाऊस पाडून दाखवला. त्यामुळे फिर्यादीसह त्या दोघांचा आणखी घट्ट विश्वास बसला. मी सर्व विधीवत पुजाकरुन तुम्हाला काही दिवसात मोठा पैशांचा पाऊस पाडून तुम्ही दिलेली रक्कम दुप्पट करुन देतो, असे सांगत १४ जुलै रोजी औरंगाबाद येथील कार्तिके हॉटेलवर बोलावून पुजेच्या साहित्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या तिघांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.