मुंबई : कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) आज क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीचे (NCB) तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरच कारवाई होणार असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Aryan Khan Latest News)
कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे होता. वानखेडेंनी जो तपास केला त्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होत होता. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर पुढे या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे देण्यात आला होता. दरम्यान, आज या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे नवे आरोपपत्र समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समीर वानखेडे यांची भूमिका आता वादात सापडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीदरम्यान छापेमारी केली होती. गेल्या वर्षी २ आणि ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली होती. चौकशीनंतर आर्यनची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आर्यन याने जामिनासाठी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने त्याला २८ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने दोन दिवस त्याला तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी त्याची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती.
नवाब मलिकांचे आरोप काय होते?
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सूडबुद्धीने अशा कारवाया करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिक यांच्या जावयाला वानखेडे यांनी अटक केल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे हे खोटे जात प्रमाणपत्र देऊन भरती झाल्याचा आरोप मलिकांकडून करण्यात आला होता.
समीवर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक यांच्याकडून करण्यात आला होता. तशी कागदपत्रेही मलिक यांच्याकडून दाखवण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे यांनीही आपली जातप्रमाणपत्रे दाखवत सर्व आरोप फेटाळून लावले होते. हा वादही राज्याच्या राजकारणात बराच चर्चेत राहिला होता.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.