अक्षय शिंदे, जालना, ता. ११ सप्टेंबर २०२४
Arjun Khotkar On Mahayuti Seat Distribution: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या जागा वाटपांवरुन महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये जोर- बैठका सुरु असतानाच शिंदे गटाचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात, असे मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
"राज्यामध्ये आम्ही तीन पक्ष लढतो. एखाद्या दुसऱ्या जागेवर किंवा दहा पाच जागेवरती असा प्रसंग येऊ शकतो की जिथे टोकाचा प्रसंग येईल. अशावेळी निर्णय घेणे पक्ष श्रेष्ठींनाही अवघड जाते. अशा स्थितीत आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये त्यामुळे दोन पाच जागेवरती असा निर्णय झाला तर फार वावग नाही. यापूर्वी अशा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत. पक्ष वाचवण्यासाठी असा प्रयत्न सर्वांनाच करावा लागेल," असे महत्वाचे विधान अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
तसेच "एकनाथ शिंदे येणाऱ्या निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत त्यामुळे आमची अपेक्षा आहे की जास्त जागा आम्हाला आल्या पाहिजेत. जास्त नाही जर समसमान जागा तरी आल्या पाहिजेत एवढी आमची मागणी असणार आहे. शेवटी नेते निर्णय घेतील, पण पक्षाचा शिपाई म्हणून ही माझी भावना आहे की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकट्याच्या बळावर सरकार येणं इतिहास जमा झाले आहे. आम्हाला जेवढी गरज तेवढीच भाजपला आहे आणि राष्ट्रवादीला आहे, सर्वांनी जागा कश्या निघतील त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे," असेही अर्जुन खोतकर म्हणाले.
दरम्यान, महायुतीमध्ये सध्या लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनीही याबाबत एक महत्वाचे विधान केले. राज्यात आतापर्यंत जेवढ्या योजना आल्या तेवढ्यापैकी सर्वात भारी योजना लाडकी बहीण योजना आहे. यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे योगदान खूप मोठे आहे. काकण भर का होईना शिंदे साहेबांच योगदान मोठं आहे, असे ते म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.