अक्षय गवळी
अकोला : अठराव्या शतकात मुघल साम्राज्याच्या अखेरच्या काळात बांधणी करण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कमकुवत झालेल्या किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. दरम्यान बुरुज ढासळला यावेळी कोणतीही हानी झाली नसली तरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वैभव नष्ट होताना दिसून येत आहे.
बाळापुरच्या ऐतिहासिक किल्ल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. बाळापूर किल्ल्याची बांधणी १८ व्या शतकात मुघल साम्राज्याच्या अखेरच्या काळात करण्यात आली. काही ऐतिहासिक साधनांनुसार इ.स. १७२१ मध्ये मुघल सरदार इस्माईल खान यांनी हा किल्ला बांधल्याचे उल्लेख सापडतात. या काळात बाळापूर हे महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. नद्यांच्या मधोमध उंच जमिनीवर वसलेल्या या किल्ल्याला त्याच्या काळातील उत्कृष्ट वीटकामाने बांधलेल्या अतिशय उंच भिंती आणि बुरुज आहेत.
विदर्भ, खानदेशातील सर्वात मजबूत किल्ला
बाळापूर तालुक्याचे शहर असून अकोला जिल्ह्याचे मुख्यालय २९ किमी अंतरावर आहे. मन आणि महेशा नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर एक ऐतिहासिक शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर बांधलेला किल्ला आहे. जो कदाचित महाराष्ट्रातील विदर्भ आणि खानदेश प्रदेशातील सर्वात मजबूत आहे. १७२१ मध्ये सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने किल्ल्याची सुरुवात केली. तर १७५७ मध्ये एलिचपूर (आताचे अचलपूर, अमरावती जिल्हा) च्या नवाब इस्माईल खानने पूर्ण केले.
किल्ल्यात आहेत तीन सरकारी कार्यालय
किल्ला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असून आज काही सरकारी कार्यालये आहेत. सध्या बाळापूरच्या किल्ल्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय असे तीन कार्यालय आहेत. बुरुज ढासळतांना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुरातत्व विभागाने किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळला असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बुरूज ढासळतांनाचा व्हिडीओ हाती लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.