
अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमाला अजित पवार यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी बीडमधील गुन्हेगारीवर भाष्य केले.
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (७ ऑगस्ट) त्यांनी ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला हजेरी लावली. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना चुकीचं वागाल तर मकोका लावू आणि मग चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग... जो चुकेल त्याला शासन होईल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी चुकीचे वागणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. 'जर कोणी चुकीचे वागत असेल आणि कायदा हातात घेत असेल तर त्यांना शासन झालंच पाहिजे. मधल्या काळात जिल्ह्याची बदनामी झाली. मात्र यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. चुकीचे वागेल, त्याला मकोका लावू. नंतर मग चक्की पीसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग आणि आतमध्ये घालू', असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
अजित पवार म्हणाले, 'माझ्यासकट सर्वांना कायदा समान आहे. तो कोणत्याही पक्षाचा, कोणत्या जाती धर्माचा आहे हे न पाहता त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. कोणीही चुकीचे वागू नका. चुकीचं वागणाऱ्यांना सांगा, पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे, यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यासमोर कोण लहान, कोण मोठं नाही, सर्वजण समान आहे.'
मागील काही काळापासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण अशा घटनांमुळे बीडमधील वातावरण तापले आहे. दररोज मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कथित मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता. पुढे जाऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यादरम्यान बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.