Ahmednagar News: प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू, काल ६ जणांनी गमावला जीव
2 Youth Drowning In Pravara RiverSaam TV

Ahmednagar News: प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू, काल ६ जणांनी गमावला जीव

2 Youth Drowning In Pravara River: शुक्रवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली. हे दोन्ही तरुण प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.

सचिन बनसोडे, अहमदनगर

प्रवरा नदीमध्ये (Pravara River) बुडून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा या नदीमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर शहरातील प्रवारा नदीपात्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले आहेत. या तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली. हे दोन्ही तरुण प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. आदित्य रामनाथ मोरे (१७ वर्षे) राहणार घुलेवाडी आणि श्रीपाद सुरेश काळे (१७ वर्षे) राहणार कोळवाडे असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र असून पोहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

आदित्य आणि श्रीपाद हे पोहण्यासाठी नदीमध्ये उतरले खरे पण ते परत बाहेर आले नाही. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दोघांचा देखील नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात खड्डे पडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. दोघांच्याही मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

दरम्यान, गुरूवारी अहमदनगरच्या अकोलेमध्ये प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. यामधील एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफचे पथक आले होते. शोधमोहीम सुरू असताना एसडीआरएफ जवानांची बोट उलटली. एसडीआरएफ जवानाच्या बोटीमध्ये पाच जवान आणि एक स्थानिक तरुण होता. बोट उलटल्यामुळे तीन जवान आणि तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला होता. गुरूवारच्या या घटनेत नदीमध्ये बुडून एकूण ६ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com