देशात ४०० पार अन् राज्यात ४५ प्लसचा नारा घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला होता. राममंदिराचा मुद्दा, मोदींचा करिश्मा, प्रभावी प्रचार यामुळे सुरूवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल, असेच चित्र होते. मात्र निकालानंतर एनडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दिग्गजांनी सर्वाधिक लक्ष घातलेल्या महाराष्ट्रातच सर्वात मोठा धक्का बसला असून मोदी मॅजिक फ्लॉप ठरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधानांनी सभा घेतलेल्यांपैकी नेमके किती उमेदवार निवडून आले? जाणून घ्या सविस्तर.
लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये सभा अन् प्रचारांचा धडाका लावला होता. राज्यात त्यांच्या १८ सभा अन् १ रोड शो झाला. या झंझावती प्रचारानंतरही महाराष्ट्रात भाजपला जागा जिंकण्यात अपयश आले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेल्या उमेदवारांचाच अनेक ठिकाणी पराभव झाला.
राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सभा घेतली होती. यापैकी पुणे आणि मावळच्या फक्त दोन जागा महायुतीला मिळवण्यात आल्या. त्याचबरोबर माढा, सातारा, कोल्हापूर अन् सोलापूरमध्येही मोदींनी सभा घेतली. यापैकी सातारा वगळता सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले.
उत्तर महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदींच्या सभांची जादू चालली नाही. पंतप्रधान मोदींनी नगर, नाशिक, दिंडोरी, नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. तसेच मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, धाराशिवमधील उमेदवारांसाठीही त्यांच्या सभा झाल्या. यांपैकी एकही ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला नाही.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही मोदींच्या सभा झाल्या. याठिकाणी नागपुर आणि अकोला वगळता आठ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. विदर्भात चंद्रपूर, रामटेक वर्धा याठिकाणी त्यांच्या सभा झाल्या होत्या. या तिनही ठिकाणी महायुतीचा पराभव झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.