सातारा लोकसभेसाठी शरद पवारांनी आमदार शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महायुतीने अद्याप ठरवलं नसलं तरी उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सातारा कायम शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. या निवडणुकीत पवारांचा मल्ल उदयनराजेंना भारी पडणार का? याची उत्सुकता लागली आहे.
साताऱ्यातील लोकसभा लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. उमेदवार जाहीर करायला पुरेसा वेळ घेत अखेर पवारांनी साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलंय. त्यामुळे शरद पवारांचा खास मल्ल उदयनराजेंना जड जाण्याची शक्यता वर्तवली जातीय़. महायुती साताऱ्यातील उमेदवाराबाबत सावध पावलं उचलताना दिसतेय. मात्र साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. तर आपल्यासमोर कुणाचंही आव्हान नसल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनीही शड्डू ठोकलाय.
साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देऊन पवारांनी तुल्यबळ उमेदवार उदयनराजेंविरोधात उभा केल्याची चर्चा आहे. सातारा जिल्हा कायम शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिलाय. साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक आणि पवारांच्या पावसातल्या सभेनं संपूर्ण वातावरण फिरलं होतं.
उदयनराजे भोसलेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं गेलं. श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी पावसात जाहीर सभा घेतली आणि संपूर्ण वातावरण फिरलं. अखेर निवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला. साताऱ्याचा गड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा कंबर कसलीय. आमदार शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवून पुन्हा एकदा उदयनराजेंच्या पराभवासाठी पवारांनी रणनिती आखली असल्याचं बोललं जातंय.
माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते मानले जातात. शिंदेंनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या प्रचारात आघाडीवर होते. पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले खरे मात्र इकडे विधानसभेत शिवसेनेच्या महेश शिंदेंसारख्या नवख्या उमेदवाराविरोधात शशिकांत शिंदेंचा 3 हजार मतांनी निसटता पराभव झाला. मात्र, शशिकांत शिंदे यांची ताकद माहिती असल्यानं शरद पवारांनी लगेच शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं. त्यामुळे या निवडणुकीत शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करतील असं बोललं जात आहे. महायुतीकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यास साताऱ्यात राजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. पवारांचा मल्ल निवडणुकीच्या मैदानात उदयनराजेंना चितपट करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.