Winter Health Tips : हिवाळ्यात सर्दी-फ्लूचा आजार का वाढतो ? या आजारात कशी घ्याल आरोग्याची काळजी

देशाच्या काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे.
Winter Health Tips
Winter Health Tips Saam Tv

Winter Health Tips : देशाच्या काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळेस वातावरणात खूप गारवा वाढू लागला आहे. हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात.

तापमानात (Weather) घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी (Healthy) राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात भूक लागते. तसंच थंडीच्या दिवसांत शरीराची हालचाल देखील कमी प्रमाणात होते. हिवाळ्यात आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Winter Health Tips
Winter Health Care : हिवाळ्यात रिकाम्या पोटी प्या 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स,नेहमी निरोगी राहाल!

उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये याआधी मान्सूनच्या महिन्यांमध्ये फ्लूचा आजार कळस गाठतो व त्यापाठोपाठ हिवाळा सुरू झाल्याझाल्या पुन्हा फ्लूचा मोसम सुरू होता.

सध्या जगभरामध्ये ‘इम्युनिटी डेब्ट’ या चिंताजनक गोष्टीचा प्रभाव असल्याने या मोसमात फ्लूचे प्रमाण लक्षणीय असेल असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. इम्युनिटी डेब्ट म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत एकमेकांपासून अंतर राखून राहिल्याने किंवा मास्क घालून राहिल्याने त्यांना नेहमीच्या सर्वसाधारण विषाणूंचाही संसर्ग झालेला नाही.

तस्लीम अली आणि सहकाऱ्यांनी (२०२२ मध्ये) केलेल्या संशोधनानुसार पॅनडेमिकमुळे घातले गेलेले निर्बंध दूर झाल्यावर याच लोकसंख्येला इन्फ्लुएन्झाचा संसर्ग होण्याची शक्यता 10 ते 60 टक्क्यांनी वाढली आहे.

यामुळे चालू 2022-23 च्या मोसमात फ्लूच्या घटनांमध्ये एक ते चार पट वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात 2022 मध्ये गोळा केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, दिल्ली, तामीळ नाडू, कर्नाकट, प. बंगाल, पंजाब व इतर राज्यांत फ्लूच्या रुग्णांमध्ये आधीच लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे व गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 15 पट वाढ नोंदविण्यात आली आहे.

अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करणकुमार सांगतात, “इन्फ्लुएन्झा हा लसीकरणाद्वारे रोखता येण्याजोगा आजार आहे आणि स्वत:ला व आपल्या कुटुंबाला या आजाराशी संबधित आरोग्य समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व प्रकारच्या लोकसंख्यागटांमध्ये केवळ मुलांनाच नव्हे तर आजारांचा धोका अधिक असलेल्या प्रौढांनाही इन्फ्लुएन्झाविरोधात बहुस्तरीय सुरक्षा पुरविणे महत्त्वाचे आहे.”

फ्लूपासून संरक्षण मिळविण्यासाठी तुम्हाला पुढील 3 उपाययोजना करता येतील -

1. आपले व आपल्या कुटुंबाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या. मुलांचे लसीकरणाचे वेळापत्रक सांभाळावे आणि प्रौढांसाठीही वार्षिक फ्लू शॉट घ्यावा. दरवर्षी फ्लूची लस घेणे हे महत्‍वाचे आहे कारण दरवर्षी फ्लूच्या विषाणूमध्ये बदल होत असतात आणि WHO ने शोधलेल्या सर्वात नव्या प्रकारानुसार हे फ्लू शॉट्स विकसित केले जात असतात.

2. आपले हात नियमितपणे धुवा. त्यासाठी साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-बेस्ड सॅनिटायझरचा वापर करा. आपल्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला स्पर्श करणे टाळा आणि सतत हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना निर्जंतूक करून घ्या.

3. आजारी व्यक्तींशी निकट संपर्क टाळा, घरांमध्ये हवा खेळती राहू द्या आणि गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा.

या उपाययोजनांमुळे तुम्हाला फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. तरीही ताप, थंडी भरणे, खोकला, नाक गळणे/चोंदणे, अंगदुखी आणि अशा फ्लूच्या इतर चिन्हांवर लक्ष ठेवा.

मुंबईतील साई कुट्टी क्लिनिकचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय पै म्हणाले, “मुंबईमध्ये, फ्लूच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आम्ही पाहिले आहे. ही वाढ थांबवायची असेल तर फ्लूचा विविध लोकसंख्यागटांवर कसा परिणाम होऊ शकतो व त्यापासून संरक्षण का महत्त्वाचे आहे हे जास्तीत-जास्त लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्व लोकसंख्यागटांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यास मदत करणे आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांमुळे अधिक प्रमाणात व्यक्तींना फ्लूपासून संरक्षण मिळू शकेल. त्याचबरोबर लक्षणांवर उपचार करणे, त्याला आराम आणि चांगल्या पोषणाची जोड देणे या महत्त्वाच्या उपाययोजनांद्वारेही या आजाराचे चांगले व्यवस्थापन करता येईल.”

Winter Health Tips
Winter Health Care : कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात सर्दी, खोकला व फ्लूचे रुग्ण अधिक का आढळतात ?

या हिवाळ्यात तुम्हाला फ्लूची लागण झाल्यास त्याची लक्षणे बरी करण्यासाठी पुढील ४ साध्या उपाययोजना जरूर करा -

1. घरी रहा आणि आराम करा -

विशेषत: फ्लूची लागण झाल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांत फार दगदग करू नका आणि आराम करा. आता दिवस अधिकाधिक गारठत चालले आहेत त्यामुळे बिछान्यातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे. या वातावरणाचा फायदा घ्या आणि छान गोधडी पांघरून झोप काढा, पुस्तक वाचा किंवा टीव्ही पहा. तोवर तुमची तब्येत ठीक होईल आणि शरीराची ताकद परत येईल.

2. भरपूर द्रवपदार्थ घ्या -

पातळ पेजेसारखी हिवाळी सूप्स (उदा. चिकन नूडल सूप्स) आणि कॅफिनरहित गरम हर्बल चहा (आल्याचा किंवा शॅमोमाइल टाकलेला) म्हणजे फ्लूशी दोन हात करण्याचे उत्तम साधन आहे. तसेच गरम लिंबूपाणी, नारळपाणी आणि ताज्या फळांचा रस यांचे लक्षणांना निवळविण्यासाठी होणारा फायदा दुर्लक्षू नका.

3. व्यवस्थित आहार घ्या -

आजारी असताना कदाचित तुम्हाला फारसे खाण्याची इच्छा होणार नाही पण शरीराला चांगले पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. संत्री, डाळिंबे, स्ट्रॉबेरीज व अशी इतर मोसमी फळे भरपूर खा तसेच पालेभाजी आणि रताळ्यासारख्या हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचाही आहारात समावेश करा. काळीमिरी, आले आणि हळद यांचा वापर असलेल्या मसालेदार पदार्थांमुळेही दाह कमी होतो व नाक मोकळे होण्यास मदत होते.

4. वाफ घ्या -

विशेषत: नाक चोंदले असेल तर हॉट शॉवर घ्या किंवा वाफेमध्ये श्वास घ्या म्हणजे नाक मोकळे होईल. यामुळे तुमच्या शरीरात उबही टिकून राहील.

या उपाययोजनांखेरीज, आपली लक्षणे गंभीर होत असल्याचे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे तुमची आवश्यक ती देखभाल घेतली जाईल, तुम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकाल आणि तुम्हाला चटकन बरे वाटू लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com