Valentine Day Love Letter: प्रिय मी..! मसला ये नही की... गम कितने है, मुद्दा ये है की... परवाह किसको है!

Love Letter: आपल्या मनातील भावानांना पत्राद्वारे वाट मोकळी करून द्या. आपल्या प्रियजनांना आपल्या आवडत्या व्यक्तींना लिहा प्रेमपत्र.
Valentine Day Love Letter
Valentine Day Love Letter
Published On

आज मन खूप जड आहे. म्हणूनच एक पत्र लिहावंसं वाटलं. नेहमीसारखं कुणाला नाही… ना प्रियकराला, ना एखाद्या हरवलेल्या प्रेमाला. आज हे पत्र स्वतःलाच. कारण कधी कधी सगळ्यात जास्त समजून घ्यायची गरज आपल्यालाच असते. प्रेम, प्रियकर, नातं… या शब्दांशी माझा कधीच फारसा संबंध आला नाही आणि हे खरं सांगितलं की लोकांना ते खोटं वाटतं.... कदाचित कारण माझा स्वभाव. माझा स्वभाव… फ्रीली, मनमोकळा, हसरा, बोलका, मोकळा. लोकांशी सहज जोडणारा. समोरचा कोण आहे, काय आहे, हे न पाहता त्याच्याशी माणूस म्हणून वागणारा.... पण हेच तर माझं दुखणं आहे ना? कारण मी जशी आहे, तशीच राहते. आणि जग तसं नसतं. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल, हिचा स्वभाव आहे तरी कसा...?

तर माझा स्वभाव… लोक म्हणतात, खूपच फ्री आहेस तू....खूपच मनमोकळी आहेस.... सगळ्यांशी लगेच जुळवून घेतेस. .पण कुणी हे विचारत नाही… याची किंमत मला किती वेळा मोजावी लागलीय. पण “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…” हे गाणं कित्येक वेळा स्वतःला समजावताना आठवतं.... पण लोक जेव्हा बोलतात, तेव्हा शब्द फक्त कानांवर नाही… मनावर ओरखडे काढतात....

मी हसते.... मी ऐकून घेते... मी समजून घेते... कारण मला वाटतं, जसं माझं मन आहे, तसंच समोरच्याचंही असेल. पण म्हणतात ना, जग दिसतं तसं नसतं.... सबको मालूम है इश्क़ मसूम है…. पण माझ्यासाठी माणुसकीही तितकीच मासूम आहे.... मी लोकांना जागा देते....मनात, वेळेत, आयुष्यात.... आणि तेच लोक माझ्या त्या जागेचा गैरफायदा घेतात....तेव्हा समजतं, मी चुकले नाही. मी फक्त जास्त दिलं. जरा जास्त समजून घेतलं....जरा जास्त विश्वास ठेवलाय. आणि त्याचा त्रास मात्र मलाच होतो. म्हणूनच आज हे पत्र… कोणाला नाही, तर स्वतःला...

प्रिय मी,

जरा स्वतःवर ताबा ठेवायला शिक.... सगळ्यांसाठी उघडं मन ठेवणं ही चूक नसली, तरी सगळ्यांना सारखीच जागा देणं चुकीचं ठरू शकतं... प्रत्येक हसणारा आपलाच असतो असं नाही. प्रत्येक गोड बोलणारा खराच असतो असं नाही. आणि प्रत्येक जण तुझ्या मनासारखाच विचार करेल, ही अपेक्षा ठेवणं तर अजूनच धोकादायक... हे पत्र लिहिण्यामागे एकच कारण आहे, तुला थोडं थांबायला शिकवायचं आहे... सगळ्यांसाठी उघडं मन ठेवणं ही तुझी ताकद आहे... पण तीच तुझी कमजोरी बनू देऊ नकोस... “दिल तो बच्चा है जी…” हो… माझं मन खरंच लहान आहे. लवकर विश्वास ठेवणारं, लवकर गुंतणारं, आणि उशिरा सावरणारं.... पण आता… त्याला थोडं मोठं होऊ दे. प्रत्येक गोड बोलणारा आपलाच असतो असं नाही... प्रत्येक काळजी दाखवणारा खरंच काळजी घेतो असं नाही. आणि प्रत्येक जण तुझ्या भावनांचा मान ठेवेल याची खात्री नसते...

तू चांगली आहेस, हे बदलू नकोस. पण सगळ्यांसाठी तितकीच खुली राहणं थोडं थांबव. स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व देणं… स्वतःची वेळ, भावना, शांतता बाजूला ठेवून समोरच्याला खुश ठेवणं… हे थांबवायला शिक. कारण जेव्हा तू तुटतेस, तेव्हा कुणालाच फरक पडत नाही. तुझं मन खूप कोवळं आहे. ते जपायला शिक. कोण पात्र आहे, कोण नाही हे ओळखायला वेळ घे. “किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…” हे छान आहे.... पण स्वतःची मुस्कान गमावून नाही... स्वतःपेक्षा दुसऱ्याला महत्त्व देणं... थोडं थांबव.... सगळ्यांसाठी उपलब्ध राहणं कधी कधी बंद कर... कारण जेव्हा तू एकटी रडतेस, तेव्हा कुणालाच फरक पडत नाही. “मैं अकेली ही सही…” हो, एकटी असणं वाईट नाही. चुकीच्या लोकांसोबत असण्यापेक्षा एकटं असणं कधीही चांगलं. प्रिय मी, तुझं हसणं जप... तुझी मोकळीक जप. पण ती सगळ्यांसाठी नाही. जरा पारख कर... जरा वेळ घे. जरा स्वतःला पहिलं स्थान दे... “खुद को समझ के जीना भी एक फन है…” आणि तो फन आता शिकायची वेळ आलीय...

तुझं हसणं, तुझी मोकळीक हे तुझं सौंदर्य आहे. पण ते सगळ्यांसाठी नाही. कधी नाही म्हणायला शिक. कधी दूर राहायलाही शिक. आणि सर्वात महत्त्वाचं… स्वतःला दोष देणं बंद कर.... तू चुकीची नाहीस. तू फक्त जरा जास्त खरी आहेस. बस एवढंच स्वत:ला सांगणं आहे... आज हे पत्र इथे थांबवते… पण या पत्रामागचा अर्थ लक्षात ठेव: जगाशी जुळवून घेताना स्वतःला हरवू नकोस. पण वचन दे, पुन्हा तुटशील, पण स्वतःला हरवणार नाहीस. कारण शेवटी सगळ्यात मोठं प्रेम स्वतःवरचं असतं....

खुल जायेगे सभी रास्ते तू रुकावटों से लड सही...

सब होगा हासिल तू अपनी जिद पर अड़ तो सही!

तुझीच,

मी

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com