Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Valentine Day Love Letter In Marathi: एखाद्यावरील राग आपण आपल्या बोलण्यातून सहजपणे व्यक्त करून जात असतो. पण त्याचजागी कोणावर असलेलं प्रेम त्याला सांगायचं असेल तर आपले शब्द मनातच कैद होऊन बसतात. त्यामुळे आपल्या पत्रात भावना व्यक्त करा, आपल्या मनातील भावना ओठांवर येऊ द्या.
Valentine Day Love Letter In Marathi
Valentine Day Love Lettersaam tv
Published On

"प्रिय...

या दिवशी माझ्या प्रेमाला तू दिलेलं होकारार्थी उत्तर म्हणजे जणू माझ्या आयुष्यात स्वर्गातून उतरलेली एक परीच होतीस. जवळपास पाच वर्षांचा आपला हा प्रेमप्रवास माझ्या कोलमडलेल्या आयुष्याला नव्या आशा, नव्या स्वप्नांची दिशा देणारा ठरला.

बालवाडीपासून चौथीपर्यंत एकाच वर्गात शिकलेलो आपण—बालमैत्रीतून कधी एकमेकांच्या प्रेमात पडू, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू माझी प्रेयसी झालीस, ही स्वामींनी मला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे.

लहानपणीच्या आपल्या निरागस आठवणींचा ठेवा आजही माझ्या मनात तसाच जिवंत आहे. मधल्या सुट्टीत घरी जेवायला गेल्यावर लावलेली पावडर, त्यावरची ती बारीकशी टिकली—आजही ती प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर तशीच उभी राहते.

तू माझ्या आयुष्यात आलीस आणि प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, हे मला कळलं. किशोरवयात मी अनेक चुका केल्या. माझा भूतकाळ तुला माहीत असूनही तू मला स्वीकारलंस. आधीच्या अनुभवांमुळे प्रेमावरचा माझा विश्वास उडाला होता, पण तुझ्यासोबत बोलताना जाणवलं—प्रेम हे फक्त प्रेम असतं; पहिलं-दुसरं असं काही नसतं.

मी तुझं पहिलं प्रेम होतो आणि या पाच वर्षांत तू मला मनापासून, निस्सीम प्रेम दिलंस.

आपण भेटलो, हातात हात घेऊन चाललो, भविष्य पाहिलं, स्वप्नं रंगवली, एकमेकांसाठी जीव ओतून प्रेम केलं. जवळपास साडेचार वर्षांचा आपला प्रवास किती निरोगी होता! इतर जोडप्यांसारखी साधी किरकिरही आपल्यात कधी झाली नाही. तू कधी हट्ट केला नाहीस आणि मी कधी तुझ्यावर चिडलो नाही. किती सुंदर होते ते दिवस!

माझी प्रेयसीच माझी काळजी घेणारी बहीण, माझी जिवलग मैत्रीण—माझं सर्वकाही झालीस तू.

आयुष्यात खूप ठोकर खाल्ल्यावर, प्रेमात पूर्णपणे खचलो असं वाटत असताना आणि आयुष्यात काहीच उरलेलं नाही असं भासू लागलं असताना, तू आलीस आणि माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलंस. मी अहमदाबादला नोकरीसाठी स्थलांतर केलं; तू खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झालीस आणि पुढे सरकारी शिक्षिका झालीस—मला तुझा अभिमान वाटतो.

वय वाढत गेलं, आपण लग्नाबद्दल बोललो आणि तुझ्या कुटुंबीयांकडून नकार आला. पण धनु, पाच वर्षांत मी तुला खुश ठेवू शकतो, तुझी आयुष्यभर काळजी घेऊ शकतो—हा विश्वासही मी तुला देऊ शकलो नाही का?

जर मी तुला योग्य वाटत असेन, तर तू आपली बाजू ठामपणे मांडशील, अशी मला आजही आशा आहे. मी तर रोज याच विचाराने जगलो की माझ्या धनुला आयुष्यात कधीच काही कमी पडू नये; ती नेहमी खुश राहावी.

लोक तर देवावरही रागावतात, नावं ठेवतात. पण आयुष्य आपल्यालाच जगायचं असतं; निर्णयही आपल्यालाच घ्यावे लागतात. तू जेव्हापासून माझ्याशी बोलणं थांबवलंस, तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तू माघार घेत असल्याचं पाहून मला जबर मानसिक धक्का बसला आहे.

असो… मी तुला कुठल्याही प्रकारची बळजबरी करणार नाही.

तुझं आयुष्य तुझ्या मर्जीने जगण्याचा पूर्ण अधिकार तुला आहे. त्यात मी कधीच अडथळा ठरणार नाही.

पण शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझीच वाट पाहत राहीन. तू सोडून माझ्या आयुष्यात कोणीच येऊ शकत नाही.

एकदा तरी मनापासून विचार कर.

लिहायचं खूप काही आहे, पण खरं सांगायचं तर आत्ता माझं डोकं पूर्णपणे बंद पडलंय. मनात असंख्य विचार, भावना, प्रश्न आहेत, पण ते शब्दांत मांडायची ताकद उरलेली नाही. व्यक्त व्हायचं आहे, पण शब्द साथ देत नाहीत.

तुझाच,

शुभु अर्थात शुभम

प्रेषक,

शुभम, ता. सटाणा, जि. नाशिक

टीप:

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com