Love Letter: कामाच्या वेळेत दडलेलं, मनात वाढलेलं न बोललेलं प्रेम, ऑफीसच्या नाहीतर मनाच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र

Valentine Day Love Letter: आपल्या मनातील भावानांना पत्राद्वारे करा व्यक्त. आजकालच्या व्हॉट्सअप, फोन, मेसेजच्या दुनियेत आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमपत्र. मनात दडून बसलेलं प्रेम पत्रातून करा व्यक्त.
 Love Letter:
Valentine Day Love Letter: saam tv
Published On

प्रिय ……,

खूप दिवसांपासून हे पत्र मनात लिहित होतो. आज कागदावर उतरवत आहे. कारण काही गोष्टी सांगायच्या असतात, पण त्या सांगितल्या तर नात्याचं नाव बदलून जातं… आणि न सांगितल्या तर मन रोज थोडं थोडं हरवत जातं. म्हणूनच हा प्रयत्न... आपण ऑफिसमध्ये सहकारी आहोत, हे वास्तव आहे. पण मन मात्र नेहमी वास्तव ऐकत नाही, ते स्वतःचं काहीतरी जग तयार करतं. तुझ्याशी पहिल्यांदा बोललो होतो तो दिवस आठवत नाही मला… पण त्यानंतर तुझी सवय कधी लागली, हे मात्र कळलंच नाही.

मी तुला कधी जास्त जवळ येऊन पाहिलं नाही. कधी शब्दांमध्ये हक्क दाखवला नाही. कारण मला माहीत आहे... ऑफिसमध्ये काही नाती मनातच जपायची असतात. ऑफिसमध्ये रोज तुला पाहतो, चहाचा कप हातात घेऊन, कामात हरवलेली तू… आणि मी मात्र कामात कमी....तुझ्या शांत उपस्थितीत जास्त अडकलेला.... तुझ्याशी बोलताना कधीच मोठे शब्द वापरले नाहीत. कारण मला माहीत होतं, भावना मोठ्या असल्या की शब्द आपोआप छोटे होतात. मला प्रेमाचं प्रदर्शन जमत नाही, मला हक्क सांगता येत नाही, मला फक्त तुझ्या एका साध्या “आलास का?” मध्ये दिवसभराचं समाधान सापडतं.

तू हसलीस की मी कारण शोधत नाही. तू शांत असलीस की मी प्रश्न विचारत नाही. कारण काही भावना उत्तर मागत नाहीत, त्या फक्त स्वीकारल्या जाव्यात इतकीच अपेक्षा ठेवतात. तुझ्याशी माझं नातं काय आहे याचं नाव मी कधीच ठरवलं नाही. कारण नाव दिलं की अपेक्षा जन्माला येतात आणि अपेक्षा आल्या की शांतता निघून जाते. मी तुझ्यावर प्रेम करतो असं ठामपणे सांगता येत नाही, कारण प्रेम सांगायला धैर्य लागतं… आणि मला भीती वाटते की हे सांगितल्यावर तुझ्या नजरेत मी बदलून जाईन.

काही लोक आयुष्यात येतात आणि आपल्याला बदलत नाहीत, पण आपल्याला अंतर्मुख करतात. तू तशीच आहेस माझ्यासाठी. कधी कधी वाटतं की हे सगळं सांगूच नये, मनातच ठेवावं. पण मग मन म्हणतं, सगळं न सांगितलेलं कधी कधी जड होतं... हे पत्र म्हणजे तुझ्यावर प्रेमाचा दावा नाही, तर माझ्या मनाची एक शांत कबुली आहे. तू यावर काहीच बोलली नाहीस तरी चालेल, हे पत्र वाचून तू मला थोडंसं समजून घेतलंस इतकंच पुरेसं आहे. कारण काही नाती नावाने नसतात, ती फक्त मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवलेली असतात. हे पत्र तुझ्यावर कोणताही भार टाकण्यासाठी नाही, फक्त मनात साठवलेलं थोडंसं हलकं करण्यासाठी आहे. उत्तर देशील अशी अपेक्षा नाही, समजून घेशील इतकंच पुरेसं आहे.

तुझाच,

ऑफिसमध्ये शांत दिसणारा,

पण तुझ्यात जास्तच गुंतलेला

एक सहकारी…

टीप : मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com