Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

Valentine Day Love Letter: आपल्या मनातील भावानांना पत्राद्वारे वाट मोकळी करून द्या. आपल्या आवडत्या व्यक्तीला पत्र लिहून तुमच्या फिलिंग्स सांगा. तुमच्या लेखणीतून तुमचं प्रेम व्यक्त करा.
 Love Letter
Valentine Day Love Lettersaam tv
Published On

तुझ्यासाठी…

वेळेनं थांबवलेलं, पण मनानं कधीच संपवलेलं नाही असं पत्र

प्रिय,

हे पत्र तुला वाचायला मिळणार नाही हे मला माहीत आहे. पण तरीही लिहित आहे. कारण काही शब्द न बोलले तर मन जड होतं आणि काही आठवणी न लिहिल्या तर श्वास घ्यायलाच त्रास होतो. सोशल मीडियावर झालेली आपली ओळख... मेसेंजरवरचे साधे हाय-बाय, रात्री उशिरापर्यंत चाललेले संवाद… हे सगळं कधी प्रेमात बदलले, ते दोघांनाही कळलंच नव्हतं. 'अगर तुम साथ हो, तो हर ग़म फिसल जाए…' असंच तेव्हा आपलं झालं होतं..

अडीच वर्षं... हा इतका छोटा काळ, पण तितकचं तुझ्यासोबत घालवलेले मोलाचं क्षण आणि खूप साऱ्या आठवणी. लोक म्हणतात, काय आहे अडीच वर्षं? पण त्यात माझं पूर्ण आयुष्य होतं. माझं हसणं, माझं रडणं, माझं वाट पाहणं… सगळंच... तू रोज विद्याविहारहून विरारपर्यंत दोन तासांचा प्रवास करून यायचीस. कारण मी घरी एकटाच राहायचो. मला स्वयंपाक येतो हे तुला माहीत होतं, पण कामाच्या व्यापातून जेवणाकडे दुर्लक्ष नको, हा त्यामागचा तुझा उद्देश असायचा. तुझी काळजी त्यातून जाणवायची. तुला आठवतंय, मी रोज म्हणायचो, एवढा प्रवास कशाला करतेस? आणि यावर तू हसून म्हणायचीस, तू गप्प बस… आयतं जेवण मिळतंय तर खा.जास्त विचार करू नकोस...

त्या वाक्यात तुझं प्रेम होतं. ते तुझं अस्तित्व होतं. आज समजतंय… ते आयुष्यभर पुरेल एवढं होतं आणि आता त्याच आठवणींवर जगत आहे... त्या अडीच वर्षात मला आयुष्यभर पुरेल एवढं तू नक्की दिलं आहेस. आपण किती साधं आयुष्य जगत होतो. मोठ्या स्वप्नांपेक्षा लहान क्षणांवर जगत होतो. सगळं छान चाललं होतं. हसणं, भांडणं, पुन्हा मनधरणी… सगळं अगदी साधं, पण खरं. मग तुलाही नोकरी लागली. तू व्यस्त झालीस... मी अभिमानाने तुझ्या कामाबद्दल सांगायचो.... पण नियतीला ते ऐकायचं नव्हतं... तेव्हा माहिती नव्हतं हे फक्त काही दिवसांचं आहे...

कामाला लागल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तुला खोकला सुरू झाला. सुरुवातीला आपण दोघंही दुर्लक्ष केलं. साधाच असेल, असं म्हणून... घरच्यांनी उपचार केले... डॉक्टर बदलले.... औषधं बदलली. पण तुझ्या डोळ्यात काहीतरी बदलत गेलं. तू शांत झालीस. जणू आतूनच हार मानलीस. नंतर तुला गावाला पाठवलं. माझ्यापासून लांब.... तेव्हा वाटलं, थोडा काळ आहे, परत येईल सगळं. पण मला अजिबात कल्पना नव्हती, तो शेवटचा निरोप ठरेल.

गावी गेल्यावर आपला संपर्क तुटला. फोन नाही, मेसेज नाही. दररोज वाटायचं, आज येईल काहीतरी. आणि एक दिवस दोन महिन्यांनी तो एक मेसेज आला. त्या क्षणी पायाखालची जमीन सरकली. डोळ्यांसमोर अंधार आला. डोळ्यांत पाणीही नव्हतं, फक्त पोकळी होती. तू गेलीस..... तेव्हा मी एकटा पडलो. आजही तू सोडून गेलेल्या वाटेवरच तुझी वाट पाहत आहेत. माहितीये तू आता पुन्हा तिथे येणार नाहीस...

लोक म्हणतात की, वेळ सगळं भरून काढते. पण मी म्हणतो खोटं आहे ते... वेळ फक्त सवय लावते,वेदना कमी करत नाही. आजही भूक लागली की, आधी तुझा आवाज ऐकू येतो. गप्प खा... आजही ट्रेनचा आवाज ऐकला की, विद्याविहार ते विरार डोळ्यांसमोर उभं राहतं. पण म्हणतात ना, 'कुछ रिश्ते अधूरे रह जाते हैं, मगर खत्म नहीं होते…' अगदी तसंच आहे आपलं... तू कुठेही असशील, तिथे वेदना नसतील अशी आशा आहे.तुला श्वास घ्यायला त्रास नसेल, खोकला नसेल, थकवा नसेल.

इथे मी आहे, तुझ्या आठवणींसोबत... तुझ्या नावासोबत.... आणि तुझ्यासाठी जपलेल्या स्वप्नांसोबत. तू सोबत नाहीस… पण आठवणीत आहेस.... आणि तेवढंच मला जगायला पुरेसं आहे.... हे पत्र मी रोज मनात लिहितो. आज फक्त शब्दांत उतरवलं.

तुझाच,

आजही आणि कायम.

टीप: मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com