भारतात चहा हा खूप लोकप्रिय आहे. चहा पिणार का या प्रश्नाला शक्यतो कधीच कुणी नाही म्हणत नाही. भारतीयांच्या आयुष्याची सकाळ चहाशिवाय पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा हा लागतोच. चहा नसेल तर दिवसाची सुरुवात होत नाही. त्यातही दिवसाला एक किंवा दोन नव्हे तर सात ते आठ कप चहा आरामात पिला जातो. काही जण चहाला एनर्जी ड्रिंक म्हणून पितात, तर काही औषधाऐवजी चहाच पितात. कारण त्यांच्या मते, चहा हा सर्व समस्यांवरील रामबाण उपाय आहे. भूक लागलेली असो किंवा डोकेदुःखी होत असेल, त्यासाठी चहा हा हवाच. पण इतका चहा पिणं शरीरासाठी हानिकारक असून, याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यातच रिकाम्या पोटी चहा पिल्यास त्याचे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात.
चहा पूर्णपणे वाईट नाही. चहाचे सेवन हे प्रमाणात असावे. मात्र, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, पचनाची समस्या, झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि आयुष्यभरासाठी आजार ओढावले जाऊ शकतात.
कॅफिनचे व्यसन
रोज सकाळी उठल्यावर काहीही न खाता चहा प्यायल्याने कॅफिनचे व्यसन म्हणजेच सवय लागण्याची शक्यता असते. मग एखाद्या व्यक्तीला कॅफिनचे व्यसन लागले की ती व्यक्ती प्रत्येक वेळेस चहा पिण्यासाठी तळमळत असतो. त्यामुळे भूक लागल्यावर आणि पोट रिकामा असताना चहाची तलफ लागते.
हृदयावर गंभीर परिणाम
चहामध्ये अतिप्रमाणात कॅफिन असतो. चहा रिकाम्या पोटी प्यायल्याने किंवा चहाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यावर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हृदयासाठी हे अत्यंत धोकादायक असते. आणि त्यामुळे ब्लडप्रेशरसारखे आजार होण्यास सुरुवात होते.
पचनाची समस्या
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनाची समस्या होऊ शकते. अपचन, जळजळ, गॅस, अॅसिडीटी, पोट साफ न होणं अशा प्रकारचे त्रास होतात.
झोप न लागणे
दिवसभरात प्रमाणाबाहेर चहा पिणे तसेच रिकाम्या पोटी चहा घेतल्याने स्लीप क्वाॅलिटी खराब होते. चांगल्या झोपेसाठी चहावर नियंत्रण असणं गरजेच आहे. अन्यथा चांगल्या प्रकारे झोप पूर्ण न झाल्याने आजारी पडू शकतो.
दातांवर परिणाम
चहामध्ये कॅफिन असतो हे तर आपल्याला माहितच आहे. पण चहामध्ये टॅनिनसुद्धा असतं. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने दात खराब होऊ शकतात. काही जण खूप गरम चहा पितात. ज्यामुळे कॅविटी आणि हिरड्यांचे त्रास होतात.
Edited by: Priyanka Mundinkeri