दरवर्षीप्रमाणे भारतात सर्व सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. सणासुदीच्या काळात घरोघरी गोड पदार्थांचे जेवण असते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना गोड पदार्थ आवडत असतात. पण यंदा नवरात्री उत्सव चालू असल्याने सर्वत्र आपल्याला गरबा प्रेमीची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नागरिक नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे परिधान करताना पाहायला मिळतात. नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी बनवा सातारा स्टाईल पुरणपोळी.
महाराष्ट्रातील सातारा शहर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सातारा शहरात पर्यटकांना मंदिरे, प्राचीन किल्ले, संग्रहालये आणि अनेक गोष्टी पाहायला मिळतील. निसर्गप्रेमी नागरिकांसाठी सातारा एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर नागरिकांना साताऱ्यातील खाद्यसंस्कृतीची चव सुद्धा घेता येणार आहे. सातारा शहरातील सर्वात फेमस पुरणपोळी आहे. म्हणून आज तुमच्यासाठी साताऱ्यातील फेमस पुरणपोळीची रेसिपी घेवून आलो आहोत. पुरणपोळीची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी लगेच तयार करु शकता. जाणून घ्या रेसिपी.
साहित्य
चण्याची डाळ
मैदा
तेल
पाणी
मीठ
साजूक तूप
किसलेला गूळ
वेलची पावडर
बनवण्याची पद्धत
सर्व प्रथम आवश्यकतेनुसार चण्याची डाळ घ्या. नंतर चण्याच्या डाळीला स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर डाळीला तीन ते चार तास भिजत ठेवा. चांगली भिजून झाल्यावर गॅस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा. कुकरमध्ये भिजवलेली डाळ टाकून पाणी अॅड करा. नंतर कुकरच्या चार शिट्या घेऊन गॅस बंद करा. त्यानंतर शिजवलेल्या डाळीला एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये किसलेला गूळ अॅड करा. त्यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्या कढईमध्ये शिजवलेली डाळ आणि गूळचे मिश्रण टाका. गॅस फेमला मंद आचेवर ठेवून या मिश्रणाला सतत ढवळत राहा. नंतर त्यावरुन वेलची पावडर अॅड करुन पुन्हा एकदा चांगले मिक्स करुन घ्या. मिश्रण चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करुन घ्या.
दुसऱ्या स्टेपमध्ये मिश्रणाला एका भांड्यात काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पुरणाच्या मिश्रणाला बारीक चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. सर्व मिश्रण अशा पद्धतीने तयार करुन घ्या. नंतर दुसऱ्या बाजूला मैदा घ्या. मैदाला एका भांड्यात टाकून त्यामध्ये तेल आणि पाणी टाकून पीठ सैलसार मळून घ्या. मळून घेतलेल्या पीठाला १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर पुरणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. त्याचबरोबर मैदाच्या पीठाचे सुद्धा गोळे तयार करुन त्याची पातळ अशी पारी तयार करा. त्यानंतर तयार केलेल्या पारीमध्ये पुरणाचा गोळा भरा. नंतर त्या गोळ्याला सर्व बाजूंनी बंद करुन घ्या.
नंतर पोळपाट घेवून त्यावर थोडेसे पीठ टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. अशा पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घ्या. नंतर गॅस ऑन करुन त्यावर तवा ठेवा . तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर पुरणाची पोळी दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या. अशा पद्धतीने आपली खंमग आणि लुसलुशीत पुरणपोळी तयार झाली आहे. तुम्ही सातऱ्यातील फेमस पुरणपोळीला साजूक तूप लावून बासुंदीसोबत सर्व्ह करु शकता.