छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि मराठ्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्यांना युनेस्कोद्वारे जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणअयात आला आहे. 'Maratha Military Landscapes of India' या नावाने या ऐतिहासिक किल्ल्यांची यादी युनेस्कोने अधिकृतपणे जाहीर केली आहे. चला जाणून घेऊयात हे १२ किल्ले कोणते?
साल्हेर हा किल्ला नाशिकमध्ये आहे साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. नाशिकमध्ये एकूण ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गांमध्ये साल्हेर सर्वात उंच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा प्राचीन किल्ला पुण्यातील जुन्नर शहराजवळ आहे. केंद्र सरकारने या किल्ल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले होते.
लोहगड हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला होता.
खांन्देरी हा दुर्ग जरी फारसा प्रसिद्ध नसला, तरी त्याचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तो मुंबईसमोरील सागरी मार्गावर वसलेला आहे. इ.स. १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडाऱ्याला येथे पाठवून या बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणजे रायगड. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. मराठा साम्राजाची राजधानी ही ओळख असलेला रायगड किल्ला महाड शहराजवळ आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी असे होते.
मराठ्याची पहिली राजधानी अशी राजगड किल्ल्याची ओळख आहे. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा असल्याने शिवरायांनी राजगडला राजधानी बनवले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट प्रतापगडावर झाली होती. याच ठिकाणी शिवरायांनी अफजलखानचा कोथळा काढला होता. हा किल्ला ऐतिहासिकदृष्टा खूप महत्त्वाचा आहे.
सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा किल्ला आहे. हा एक जलदुर्ग म्हणजेच समुद्रातील किल्ला आहे. या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे.
पन्हाळा किंवा पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख किल्ला आहे. किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला होता. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडून शिवराय विशाळगडाकडे निसटले होते. या मोहिमेमध्ये शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली होती.
विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रात स्थित असलेला एक महत्त्वाचा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्याचे बांधकाम करवून घेतले. भारतातील सर्वात जुने आणि भक्कम समुद्री किल्ले म्हणून विजयदुर्गची ओळख आहे.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील भव्य जलदुर्ग आहे. अरबी समुद्रातील हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. मालवणजवळ उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख आणि पहिले मुख्यालय मानले जाते. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते.
जिंजी किल्ला हा तमिळनाडू राज्यात स्थित एक ऐतिहासिक दुर्ग आहे. रायगड आणि राजगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून या किल्ल्याला मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, छत्रपती राजाराम महाराजांनी याच जिंजी किल्ल्याला आधार बनवून हिंदवी स्वराज्याच्या पुनःस्थापनेचा निर्धार केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.