जळगावचा पारा मार्चमध्येच ३८ अंशांवर; जळगावकरांनो तब्येत सांभाळा..

जळगावचा पारा मार्चमध्येच ३८ अंशांवर; जळगावकरांनो तब्येत सांभाळा..

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील तापमानात आता दिवसागणिक वाढ होत असून, सकाळपासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यंदा मार्चमध्येच तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने आगामी काळात जळगावकरांना झळा सोसाव्या लागणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच दुपारी रस्त्यांवर होणारी वाहतूकही काही प्रमाणात रोडावली असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

यंदा मार्चमध्येच शहराच्या तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. आज शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले गेल्याने तापमानाची चाळीशीकडे वाटचाल आहे. त्यामुळे जळगावकरांना सकाळी नऊपासून उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने दुपारी वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असून, उकाडाही असह्य होऊ लागला आहे. यंदा जळगावकर कडाक्‍याच्या थंडीनेही गारठले होते, त्याचप्रमाणे कडक उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचे चित्र या वाढत्या तापमानावरून दिसत आहे. बदलत्या तापमानामुळे ताप, व्हायरल इन्फेक्‍शन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कुलर विक्रेत्यांनी थाटली दुकाने 
उन्हाळ्याची चाहूल लागताच जळगावात ठिकठिकाणी कुलर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच घरात ठेवलेल्या जुन्या कुलरची दुरुस्ती करून ते घराच्या खिडकीत लावण्याची लगबग नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

शीतपेयांच्या दुकानांत गर्दी
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असल्याने शरिराला गारवा मिळावा, यासाठी लिंबू सरबत, बर्फ, मठ्ठा, चिंचेचे पन्हे, उसाचा रस विक्रेत्यांनी गेल्या महिन्यापासूनच दुकाने थाटली आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शीतपेय विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

बागायत रुमालांसह गॉगलला पसंती
उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिकांकडून डोक्‍याला बांधण्यासाठी बागायती रुमालाला अधिक पसंती असते. उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांकडून मोठ्या आकाराच्या बागायत रुमालाची खरेदी केली जात आहे. तसेच उन्हापासून डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगलही खरेदी करीत आहेत.

तापमान आणखी वाढण्याचा अंदाज
शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दुपारी अंगाला चटके लागणारे ऊन जळगावकरांना सहन करावे लागत आहे. आज शहराचे तापमान ३८ अंश नोंदविले गेल्याने आगामी काळात त्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

WebTitle : marathi news temperature increased in jalgaon mercury reached 37 degree   

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com