The Godfather: १९७२ ते २०२२ - 'द गाॅडफादर'ची पन्नाशी

मारिओ पुझो आणि फ्रान्सिस अल कपोला या द्वयीने या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांना ७० च्या दशकात अशी 'द गाॅडफादर'च्या रुपाने अशी 'आॅफर' दिली होती की प्रेक्षक ती नाकारूच शकले नाहीत!
'द गाॅडफादर' चित्रपटात मार्लन ब्रँडो (डाॅन व्हिटो काॅर्लिआॅन) आणि अल पचिनो (मायकोल काॅर्लिआॅन)
'द गाॅडफादर' चित्रपटात मार्लन ब्रँडो (डाॅन व्हिटो काॅर्लिआॅन) आणि अल पचिनो (मायकोल काॅर्लिआॅन)- Saam TV
Published On

मी त्याला अशी आॅफर देणार आहे की समोरचा ती नाकारूच शकणार नाही (I am Gonna make him an offer he can't refuse)....डाॅन व्हिटो काॅर्लिआॅनने आपल्या शत्रूला शेवटचा पर्याय देण्यापूर्वी हे वाक्य उच्चारतो. म्हटलं तर या सौदा आहे आणि त्या पेक्षाही थंड डोक्यानं दिलेली धमकी.....द गाॅडफादर (The Godfather) या हाॅलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटात अभिनेता मार्लन ब्रँडोच्या तोंडातले हे वाक्य. (The Godfather Hollywood Movie Completed Fifty Years)

सूड हा असा एक पदार्थ आहे की जो थंड असतानाच चविष्ट वाटतो (Revenge is a dish that tastes best when it is cold) किंवा जो मनुष्य आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत नाही तो माणूसच नव्हे.....तुम्ही काय विचार करता आहात हे समोरच्याला कधी जाणवू देऊ नका (Never let anyone know what your are thinking).....असे अनेक प्रसिद्ध डायलाॅग्ज असलेल्या 'द गाॅडफादर' या माफियापटानं नुकतीच (१४ मार्च २०२२) पन्नाशी ओलांडली.

मूळच्या इटलीच्या पण अमेरिकेत जन्मलेल्या मारिओ पुझो (Maro Puzo) या लेखकाच्या लेखणीतून उतरलेली 'द गाॅडफादर' ही कादंबरी. १९६९ मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. १४ मार्च १९७२ मध्ये याच कादंबरीवर आधारित 'द गाॅडफादर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'द गाॅडफादर' हे चित्रपट इतिहासातले अजरामर पात्र बनले.

हाॅलीवूडच्या 'पॅरामाऊंट पिक्चर्स'चा हा चित्रपट. ८०००० डाॅलर्सला पॅरामाऊंट पिक्चर्सने या कादंबरीचे हक्क विकत घेतले होते. मार्लन ब्रँडो (डाॅन व्हिटा काॅर्लिआॅन) अल पचिनो (मायकेल काॅर्लिआॅन) या अभिनेत्यांच्या दर्जेदार भूमीकांनी गाजलेला. प्रसिद्ध दिग्दर्शक फ्रान्सिस अल कपोला आणि मूळ कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली. फ्रान्सिस अल कपोला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

२७ मार्ज १९७३ रोजी लाॅस एंजेलिस येथे झालेल्या ४५ व्या अॅकॅडमी अॅवाॅर्डस् कार्यक्रमात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ठ अभिनेता (मार्लन ब्रँडो) आणि सर्वोत्कृष्ठ पटकथा असे तीन सन्मान मिळाले. या व्यतिरिक्त या चित्रपटाला सात आॅस्कर नाॅमिनेशनही मिळाली होती. २४ मार्चला हा चित्रपट अमेरिकेत सर्वत्र प्रदर्शित झाला. त्या काळी या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर २५० दशलक्ष डाॅलर्सचा धंदा केला.

इटलीच्या सिसिलियन माफियांच्या जीवनावर आधारलेली ही कथा. 'द गाॅडफादर' चित्रपटाप्रमाणेच ही कादंबरीही बेस्ट सेलर ठरली. या कादंबरीचे जगभरातल्या अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. आजही ही कादंबरी आवडीने वाचली जाते. १९४५ पासून पुढच्या कालखंडात ही कथा घडते. डाॅन व्हिटो काॅर्लिआॅन, त्याचा भडक डोक्याचा मोठा मुलगा सोनी, वडिलांचा 'व्यवसाय' न पटून अमेरिकन सैन्यात दाखल झालेला धाकटा मुलगा मायकेल, कुटुंबाचा वकिल टाॅम हेगन यांच्या भोवती हे कथानक फिरते.

वर्चस्वाच्या वादातून आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय करावा की नाही या संघर्षातून व्हिटो काॅर्लिआॅन आणि त्याचा मुलगा यांच्यातच मतभेद होतात आणि त्याचा फायदा इतर माफिया संघटना घेतात. त्यातूनच सोनीचा खून होतो, व्हिटो काॅर्लिआॅनवरही गोळ्या झाडल्या जातात. आपल्या बहिणीच्या विवाहासाठी आलेला मायकेल न कळत कुटुंबाच्या माफिया बिझिनेसमध्ये ओढला जातो आणि नंतरच्या टप्प्यात आपल्या बापापेक्षाही निष्ठूर डाॅन बनतो, अशी ही कथा.

मूळ कथानकच इतकं भक्कम आहे की कादंबरी वाचताना आणि चित्रपट पाहतानाही यातली पात्रं खिळवून ठेवतात. माफियांची जडणघडण, त्यांचे औदार्य, एखाद्याला मदत करतानाही त्याचा पुढे कसा उपयोग होईल याचा केला गेलेला विचार, कुटुंबातच होणारा विश्वासघात अशा अनेक पैलूंचे दर्शन या कादंबरीतून आणि चित्रपटातून होते. विशेषतः हाॅलीवूडच्या दिग्गज कलाकारांनी सर्वच पात्रे अत्यंत ताकदीने रंगवली आहेत. त्यामुळेच हा चित्रपट अजरामर बनला आहे.

खरोखरच मारिओ पुझो आणि फ्रान्सिस अल कपोला या द्वयीने या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातल्या प्रेक्षकांना ७० च्या दशकात अशी 'द गाॅडफादर'च्या रुपाने अशी 'आॅफर' दिली होती की प्रेक्षक ती नाकारूच शकले नाहीत!

(संदर्भ स्त्रोत- विकिपिडिया आणि इंटरनेट)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com