Blind Date Web Series Release In 1OTT: ‘भारताचा मोबाईल टीव्ही’ असलेल्या ‘1 ओटीटी’ या बहुभाषिक ओटीटीच्या मराठी विभागाचा शुभारंभ झाला असून शुभारंभाला ‘ब्लाइंड डेट’ ही सुप्रसिद्ध दिगदर्शक समीर पाटील यांनी दिग्दर्शित केलेली वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीज सोबतच ‘कीर्तन नाद’ हा कार्यक्रमसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून १९८० आणि १९९० च्या दशकातील गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘व्हीसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले लघुपटसुद्धा ‘1 ओटीटी’वर उपलब्ध होणार आहेत. हे सर्व रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
या शुभारंभानिमित्त ‘1 ओटीटी’ च्या सर्व संस्थापकांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी ‘1 ओटीटी’चा सह-संस्थापक आणि ब्रँड फेस आहे. या कंपनीला बीटीएल ॲक्टीव्हेशन क्षेत्रातील आघाडीचे नाव विनायक सातपुते तसेच संस्थापक सदस्य वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी तसेच आघाडीचे बँकर सतीश उतेकर आणि करमणूक उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक चेतन मणियार यांचे सहकार्य आहे.लवकरच या व्यासपीठावर गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा इतर प्रादेशिक भाषांमधले मनोरानात्मक कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. त्या माध्यमातून हे व्यासपीठ ‘भारताचा ओटीटी’ ठरणार आहे.
‘ब्लाइंड डेट’चे लेखन प्रसिद्ध लेखिका मनस्विनी लता रवींद्र आणि अपूर्व साठे यांनी केले आहे. दहा भागांच्या या वेब मालिकेत विशाखा सुभेदार, सौरभ घाडगे, हेमांगी कवी, अभिजित खांडकेकर, रुपाली भोसले, स्पृहा जोशी, हेमंत ढोमे, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, भाग्यश्री लिमये, सायली संजीव, गश्मीर महाजनी यांसारखे नामवंत आणि आघाडीचे कलाकर दिसणार आहेत. ही वेब मालिका प्रेक्षकांना अगदी मोफत पाहायला मिळणार आहे.
“ही वेब मालिका किंवा या 1 ओटीटी वरील इतर कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आपल्या गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन ‘1 ओटीटी’ हा भारताचा मोबाईल टीव्ही नोंदणी करून डाऊनलोड करायचा आहे. प्रेक्षकांना आपल्या भाषेचे मनोरंजन फुकट बघता येईल, हा उद्देश ठेऊन हा बहुभाषिक ओटीटी बनवण्यात आला आहे,” असे उद्गार ‘1 ओटीटी’चे सीओओ पुनीत केळकर यांनी काढले.
‘कीर्तन नाद’ह्याचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी पालव यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधील किर्तनकारांचे कीर्तन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच १९८० आणि १९९०च्या दशकातील गाजलेल्या मराठी सिनेमाचाही प्रेक्षक आस्वाद या व्यासपीठावर घेऊ शकणार आहेत. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई संस्थापक असलेल्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ या संस्थेच्या विध्यार्थ्यांनी बनवलेल्या शॉर्ट फिल्म्ससुद्धा प्रेक्षकांना बघता येतील.
“आज 1 ओटीटी’ या मराठी व्यासपीठाचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही दाखल करत असलेली मालिका आणि कार्यक्रम रसिकांना नक्की आवडतील आणि त्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे की,” असे उद्गार स्वप्नील जोशी यांनी काढले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.