थलायवा उर्फ रजनीकांत यांचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुकताच सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या ‘थलायवर १७०’ या चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर्स शेअर करण्यात आले आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे दोघेही ‘थलायवर १७०’ (Thalaivar 170) मध्ये एकत्र दिसणार आहेत. एकाच चित्रपटात बिग बी आणि थलायवा एकत्र दिसणार याच्या चर्चा होत होत्या, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
लायका प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचा नवा पोस्टर काल सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. कृष्णधवल पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. लायका प्रॉडक्शन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्टर शेअर करताना, कॅप्शन दिले की, “भारतीय चित्रपटसृष्टीतील शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे ‘थलायवर १७०’ च्या टीममध्ये स्वागत आहे.”
सोबतच यावेळी निर्मात्यांनी इतर कलाकारांचेही फोटो शेअर केले आहेत. चित्रपटामध्ये बिग बी बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबत, राणा डग्गुबाती, फहाद फासिल, मंजु वॉरियर, रितिका सिंह आणि दुशारा विजयनदेखील झळकणार आहेत. अनिरुद्ध रविचंदन यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली असून टीजे गनानवेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप चित्रपटाची शुटिंग झालेली नसून लवकरच शुटिंगला सुरुवात होणार आहे.
खरंतर, बिग बी आणि रजनीकांत हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत नाहीत. त्यांनी याआधी काही चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केल्या आहेत. तब्बल ३२ वर्षांनंतर ‘थलायवर १७०’मध्ये ही दिग्गज सेलिब्रिटींची फळी एकत्र दिसणार आहे. यापूर्वी बिग बी आणि रजनीकांत यांनी ‘हम’, ‘अंधा कानून’, ‘अटक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
दरम्यान रजनीकांत यांनी ‘जेलर’मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर, जगभरातही चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील गाणेही खूपच प्रसिद्ध झाले. चित्रपटाने जगभरात १००० कोटींच्या आसपास कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.