Politician Tribute To Na Dho Mahanor : ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी ना. धों. महानोर यांचे निधन झाले आहे.
ना. धों. महानोर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. उद्या म्हणजे शुक्रवारी पळसखेड येथे त्यांच्या गावी दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ना. धों. महानोर यांच्या जाण्याने मराठी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकिय नेत्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.
शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धों. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
ना. धों. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाला रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त करत म्हटले आहे की, 'ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं.
लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !'
जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, सत्यजीत तांबे, विनोद तावडे, अंबादास दानवे, अरविंद सावंत, सुनिल तटकरे, रावसाहेव दानवे, सुप्रिया सुळेसह अनेक राजकिय नेत्यांनी ना. धों. महानोर यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.