मुंबई: जगातील सर्वाधिक सुंदर आणि सर्वांत मोठा कोरलेला हिरा असलेल्या कोहिनूरबाबत (Kohinoor Diamond) अनेक शतकांपासून अनेक गूढ व रहस्यांचे आवरण आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये चुकीच्या पद्धतीने हिरावून घेतलेले भारतातील निर्विवाद प्रकारचे सर्वोत्तम असे वैभव असलेल्या ह्या हिऱ्याबद्दलच्या कहाण्या आणि विरोधाभासांवर प्रकाश टाकला जाणार आहे. डिस्कव्हरी+ (Discovery Plus) प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे (Neeraj Pandey)- फ्रायडे स्टोरीटेलर्स सोबत आणि वैविध्यपूर्ण राष्ट्रीय पुरस्कार विजेता व पद्मश्री अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) ह्यांच्यासह एकत्र येऊन 'सीक्रेटस' फ्रँचायजीमधील 'सीक्रेटस ऑफ द कोहीनूर' (Secrets Of The Kohinoor) ही रोमांचक डॉक्युसिरीज ४ ऑगस्ट २०२२ ला प्रसारित करणार आहे. (Secrets Of The Kohinoor On Discovery Plus)
हे देखील पाहा -
'सीक्रेटस ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरीच्या' विलक्षण यशानंतर डिस्कव्हरी+ 'सीक्रेटस' फ्रँचायजीचा विस्तार करून या विलक्षण हिऱ्याचे मूळ आणि मालकी ह्यावर आजसुद्धा सुरू असलेल्या चर्चा समोर आणणार आहे. या डॉक्युसिरीजमध्ये शोधानंतर ह्या हिऱ्याचे वजन कसे कमी होत गेले आणि आज ते मूळ वजनाच्या एक षष्ठांश (१/६) इतकेच उरले आहे; तसेच कोहीनूर, ज्याला आपण आपला स्वत:चा म्हणू इच्छितो तो कदाचित बादशहा बाबरने त्याच्या आठवणींमध्ये उल्लेख केलेला हिरा कदाचित नसू शकेल अशा विषयांवर प्रकाश टाकला जाईल. खासदार आणि लेखक डॉ. शशी थरूर, इतिहासतज्ज्ञ आणि एएमयु, इरफान हबीब, डॉ. एड्रिएन म्युनिच, प्रा. फरहात नसरीन, के. के. मुहम्मद, डॉ. मानवेंद्र कुमार पुंधीर, नवतेज सरना, जे. साई दीपक, डॉ. डॅनिएल किनसी, डॉ. माईल्स आणि मास्टर डायमंड पॉलिशर मिस. पॉलिन विलेम्स ह्यांचा यात समावेश असेल.
राघव जयरथ यांच्या दिग्दर्शनामध्ये या डॉक्युसिरीजमध्ये अनेक सत्ताधीशांच्या कहाण्या आणि कोहीनूर प्राप्त करण्याच्या त्यांच्या अदम्य इच्छा ह्यांचा उलगडा होतो. ज्यामुळे अनेक मोठी रक्तरंजित लढाया झाल्या, एकमेकांवर अनेकदा डावपेच टाकले गेले आणि अनेक प्रबळ सत्ताधीश व राजघराणी उद्ध्वस्तही झाली. ह्या सगळ्यांसह शक्तीशाली सम्राटांचेही जीवन या हिऱ्याभोवती विलक्षण पद्धतीने फिरत राहिले होते. कालातीत तेज असलेल्या कोहीनूरप्रमाणेच सीक्रेटस ऑफ कोहीनूर आपल्या प्रभावी कथा निवेदनामुळे आणि क्रिएटीव्ह स्वरुपामुळे तितकेच खिळवून टाकणारे असेल. पुढील काळामध्ये ते इतिहासप्रेमी, सामान्य लोक आणि इतिहासाचे जाणकार या सर्वांसाठी एक संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.
या डॉक्युसिरीजबद्दल बोलताना कलाकार मनोज वाजपेयी यांनी म्हटलं की, "या फ्रँचायजीमध्ये या विशिष्ट मालिकेला सादर करण्याची संधी अतिशय समाधानकारक आहे आणि मला यातून खूप काही शिकायला मिळाले. त्याबद्दल मी डिस्कव्हरी+ आणि नीरज पांडेंचा मन:पूर्वक आभारी आहे. हा प्रोजेक्ट त्यांच्यासोबतचा माझा दुसरा अनुभव आहे. इतक्या वर्षांपासून त्याबद्दल ऐकूनही कोहीनूरबद्दल अनेक तथ्ये मला माहिती नव्हती आणि मला खात्री आहे की, बहुतांश लोकांनाही ती माहिती नसणार आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये समोर आलेल्या तथ्यांमुळे मला अतिशय धक्का बसला आणि मी ही न सांगितलेली कहाणी दर्शकांनी बघून असेच आश्चर्यचकित होण्याची आतुरतेने वाट बघत आहे."
निर्माता नीरज पांडे या डॉक्युमेंटरीबाबत म्हणाले की, "अज्ञात, लपलेल्या व गूढ ऐतिहासिक तथ्यांनी नेहमीच मला आकर्षित केले आहे आणि त्या विषयांमध्ये खोलवर ओढून घेतले आहे. सीक्रेटस ऑफ सिनौलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कोहीनूरच्या गूढाचे अन्वेषण करण्याची कल्पना आम्हांला उत्साहित करणारी होती, कारण हा आजवरचा सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला हिरा आहे." त्यांनी पुढे म्हंटले, "डिस्कव्हरी+ सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे अधिक मोठ्या, उत्तम आणि धाडसी पद्धतीने कहाण्या समोर आणता आल्या. तसेच, आपल्या कलेचा बादशहा असलेल्या आणि त्याच्या कहाणी सांगण्याच्या कौशल्याने हा शो अतिशय उंचावर नेणाऱ्या मनोजसोबत काम करणे नेहमीच आनंददायक अनुभव असतो. सखोल संशोधन व त्यासह प्रसिद्ध विशेषज्ञांचे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून खोलवर शोध घेऊन कोहीनूरची कहाणी मांडण्यात आली आहे व त्यामध्ये तो परत स्वदेशामध्ये आणण्याच्या महत्त्वासह त्याच्या प्रवासातील आजवर समोर न आलेले तथ्यही मांडले गेले आहेत."
डिस्कव्हरी वॉर्नर ब्रदर्सचे साउथ एशियाचे फॅक्च्युअल अँड लाईफस्टाईल क्लस्टरचे हेड साई अभिषेक ह्यांनी म्हंटले, "सर्व वयोगटाच्या श्रोत्यांना मोहित करतील अशा विशिष्ट घटकांसह आम्ही आमच्या इतिहास प्रकारामध्ये नवीन मार्गाने पुढे जात आहोत. 'सीक्रेटस' फ्रँचायजीला पुढे नेताना आम्ही आमच्या आधीच अतिशय समृद्ध असलेल्या इतिहास प्रकारामध्ये आणखी एक भारतीय ओरिजिनल आयपी आणली आहे. 'सीक्रेटस ऑफ सिनौली: डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आम्हांला या विषयाचे सामर्थ्य कळाले व त्यानंतर आम्ही नीरज पांडे आणि मनोज वाजपेयीसोबत यशस्वी भागीदारी सुरू केली. कोहीनूरचा खिळवून ठेवणारा इतिहास व त्याचे समोर न आलेले भाग हे आता अधिक महत्त्वाचे आहेत व जगभरातल्या श्रोत्यांना ते माहिती असणे गरजेचे आहे." भारतातील न सांगितलेली कहाणी- 'सीक्रेटस ऑफ द कोहीनूर' मनोज वाजपेयी होस्ट करेल आणि ती ४ ऑगस्ट २०२२ ला गुरुवारपासून फक्त डिस्कव्हरी+ प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.