चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ या नाटकाची रंगभूमीवर बरीच चर्चा होत आहे. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. हे नाटक २०२२ मध्ये पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रदर्शित झालं आहे. तब्बल ३१ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर नव्या कलाकारांसोबत नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतंच या नाटकाचा २२२ वा प्रयोगही पार पडला. नुकतंच हे नाटक ‘ताली’ वेबसीरीजच्या टीमने पाहिले. नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर वेबसीरीजचे लेखक क्षितीज पटवर्धनने नाटकातील कलाकारांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
क्षितिज पटवर्धनने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ‘चारचौघी’च्या टीमचे कौतुक केले आहे, तो पोस्टमध्ये म्हणतो, “चारचौघी नाटक पाहिले आज. पहिल्यांदा आले तेव्हा मी ५ एक वर्षांचा असेन. मग एकांकिका करायच्या काळात नाटकांची पुस्तकं वाचायची ओढ किंवा खोड म्हणा, लागल्यावर चारचौघी, चाहूल, ज्याचा त्याचा प्रश्न अशी सिरीयस पण दर्जेदार आशयघन नाटकं वाचली. त्यातली सगळ्यात भारी गोष्ट वाटायची पहिल्या प्रयोगाची माहिती. या संस्थेने या वेळेला इतक्या वाजता हा प्रयोग केला. दोन क्षणाकरता पानावरुन मंचावर मन जाऊन यायचं. त्यातलंच एक चारचौघी. आज २२२ व्या प्रयोगाला तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात पाहता आलं. नाटक फार अप्रतिम रंगलं.”
क्षितिज पटवर्धन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “नाटकं जुनं आहे पण जून नाही हे या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यामध्ये पुरुष करत असलेली मारहाण, व्यसनं, कर्जबाजारी पणा अशी त्यांना पटकन व्हिलन बनवणारी मांडणी नाही. सोपा व्हिलन नाही त्यामुळे सोपं सोल्युशन नाही. आजचा रायटिंगच्या एका टीप मध्ये वाचलं की ‘पात्रांना सोल्युशन देऊ नका, सिच्युएशन द्या, मग ते निर्णय घेतील’ आणि त्यांचं तंतोतंत उदाहरण प्रशांत सरांच्या लेखणीत पाहायला मिळालं. ते अजून पाहायला आवडेल. आजच्या जगण्याबद्दल असं म्हणणं त्यांच्या लेखणीतून आलं तर फार मजा येईल.” (Theater)
क्षितिज पटवर्धन पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “चंदू सर आणि थिएटर हे देखणं समीकरण आहे. मुलीच्या लग्नाच्या मांडवात बापाची जी अवस्था असते ती त्यांची प्रयोगाला असते, बहुतेक याचं कारण ते नाटक अक्षरश: पोटच्या पोरासारखं वाढवतात. त्यांनी हे नाटक सफाईने आणि तितक्याच सच्चेपणाने उभं केलंय. पहिली बाजू त्यांचा हातखंडा आहे आणि दुसरी, त्यांचं वैशिष्ट्य. रोहिणीताई, पर्ण, कादंबरी आणि मुक्ता. माझ्या आवडत्या चार अभिनेत्री एकत्र. सगळ्यांनी अतिशय अप्रतिम कामं केलीयेत. मुक्ताच्या एन्ट्रीला प्रेक्षकांमधून जो संपूर्ण शांततेचा लांबलचक मोमेन्ट आला ना तो मी गेली अनेक वर्ष अनेक नाटकात मिस करत होतो. (तिच्याच फायनल ड्राफ्टमध्ये तो आला होता) मुक्ताच्या आणखी प्रेमात पडावं असं काम तिने केलंय!” (OTT)
आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात क्षितीज पटवर्धन बोलतो, “रोहिणीताईंची असंख्य पावसाळे पाहिलेली समज, पर्ण चा खराखुरा वाटावा असा संभ्रम, कादंबरीचा अप्पलपोटी नात्याचा अपेक्षारहित स्वीकार सगळंच प्रत्ययकारी! चारचौघीतले ते तिघे पण लक्ष वेधून घेतात, श्रेयस, निनाद आणि पार्थ यांनी पण कडक कामं केलीयेत. तांत्रिक बाजूही भक्कम. चारचौघी मध्ये एक प्रसंग आहे, ज्यात चारही बायका आपण कोणत्या प्रकारची साडी आहोत ते सांगतात, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या बाईला आपल्याच जुन्या कपाटात एक साडी दिसते जी तिने अनेक वर्षांपूर्वी घातली होती, ती त्याचा वास घेते, मग उघडून त्याचा पोत न्याहाळते, रंगावरून हात फिरवते, आणि पुन्हा नेसते. मराठी रंगभूमीला “चारचौघी” नावाची इतकी सुंदर ठेवणीतली साडी आत्ता सापडलीय हे फार बरं झालंय. मराठी व्यावसायिक रंगभूमी किती सुंदर दिसू शकते हे त्यामुळेच कळतंय. मजा आली” अशा शब्दात त्याने पोस्ट लिहिली आहे.
यावेळी नाटकाच्या प्रयोगाला श्रीगौरी सावंत, क्षितीज पटवर्धन, नंदु माधव, दिग्दर्शक रवी जाधव यांनी हजेरी लावली होती. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.