सध्या देशभरात लोकसभा २०२४ निवडणूका सुरू आहेत. उद्या पाचव्या टप्प्याचं मतदान देशात पार पडणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक सह काही ठिकाणी निवडणूका होणार आहेत. सध्या सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे. अशातच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठमोळे सेलिब्रिटींसह बॉलिवूड कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन चाहत्यांना केलं आहे.
" असं म्हणतात आपलं भविष्य आपल्या हातात असतं. त्याप्रमाणेच देशाचंहील भवितव्य आपल्या हाती आहे. येत्या २० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करा. आणि आपल्या देशाचं भवितव्य घडवा. आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करा." अशी प्रतिक्रिया देत रवी जाधव यांनी चाहत्यांमध्ये मतदान जनजागृती केली आहे.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचा सल्ला दिलेला आहे. ती आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते, "मी या भारत देशाची एक सजग नागरिक आहे. सोमवारी २० मे रोजी मुंबईत मतदान आहे. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. " यावेळी अभिनेत्रीने एक शुटिंग दरम्यानचाही किस्सा शेअर केलेला आहे. ती म्हणाली, " पाच वर्षांपूर्वी झालेल्या मतदानावेळी मी कॅनडात होते. त्यावेळी माझा नाटकाचा प्रयोग होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी अक्षरश: माझा प्रयोग संपल्या संपल्या लगेचच भारतात परतले. कारण मला आपलं मतदान चुकवायचं नव्हतं. आपल्या राज्यकर्त्यांना आणि आपल्या चांगल्या शासनकर्त्यांना कौतुकाची थाप देणं आणि न आवडलेल्या कामांप्रती आपली प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. अर्थात मतदान करणं खूप गरजेचं आहे."
सोबतच यावेळी अभिनेत्रीने न मतदान करणाऱ्यांनाही मतदान करण्याचा सल्ला दिलेला आहे. आपण देशाच्या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेतो, त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे, अशी तिने प्रतिक्रिया दिली. "नवमतदारांचं हार्दिक अभिनंदन !!! आणि बाकी मतदारांना महत्वाची आठवण सुट्टी/ पार्टी/ प्रवास... काहीही कारणं शोधू नका! मत द्या" असं कॅप्शन सोनालीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना दिलेलं आहे.
तर अभिनेत्री मधुरा वेलणकरनेही नवमतदारांसह सर्वांनाच मतदानाचा हक्क बजावण्याचा सल्ला दिलेला आहे. ती म्हणते, "लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान आहे. कोणतेही कारणं सांगू नका... मतदान नक्की करा... लोकशाहीचा हक्क बजावा... मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि लोकशाहीने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया, आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावूया."
त्यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईकरांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केलं आहे. "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा" असं त्यांनी आवाहन केलं आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी त्यासोबतच गायक विशाल ददलानी यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.