Har Har Mahadev 2022: झी स्टुडिओजच्या हर हर महादेव या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील आणि मुख्य म्हणजे यात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटाचं (Har Har Mahadev 2022) डिजीटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून यामधून या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. (Latest Marathi Movie)
हे देखील पाहा -
मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे (Subodh Bhave) या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे हे विशेष.
हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे, असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी 'ड्रीम रोल'असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे.
पुढे ते म्हणाले की, हे शिवधनुष्य पेलण्याचा मी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणाऱ्या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद, समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला आहे. अभिजित देशपांडेंचे कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अतिशय बंदिस्त पटकथा आणि झी स्टुडिओजमुळे लाभलेले दर्जेदार निर्मितीमूल्य यांनी सज्ज झालेला हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह इतर भाषांमधूनही प्रदर्शित होणार असल्याने आनंद द्विगुणीत झालेला आहे.
हर हर महादेव चित्रपटाच्या भव्यतेबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, "यंदाची दिवाळी ही 'झी स्टुडिओज'च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी मनात इच्छा होती. हर हर महादेव या चित्रपटाच्या माध्यमातून ही पर्वणी आम्ही घेऊन येणार आहोत. छत्रपतींच्या कार्याचा त्यांच्या कर्तृत्वाचा महिमा हा केवळ राज्य आणि देशच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. आभाळाएवढं कर्तृत्त्व असलेल्या आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांची गोष्ट सादर होताना ती त्याच भव्यतेच्या तोलामोलाची असावी असा विचार कायम मनात होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं कार्य अशाच भव्य दिव्य स्वरुपात आपण आणणार आहोत याचा विशेष आनंद आहे. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम अहोरात्र झटत आहे.
अनेक हॉलिवुड चित्रपटांवर काम केलेले नामांकित असे चारशेहून अधिक व्हिएफएक्स तंत्रज्ञ या चित्रपटावर काम करत आहेत हे विशेष. चित्रपटाची ही व्याप्ती लक्षात घेऊनच तो पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला आहे. सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.
Edited By - Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.