OMG 2 Trailer Date Postponed: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडीओमध्ये गळफास घेत जीवन संपवले. त्यांच्या अचानक एक्झिटने सिनेइंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला ही मोठा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर नितिन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ‘ओएमजी २’ (OMG 2)च्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिलीय.
बुधवारी अर्थात २ ऑगस्ट रोजी ‘ओएमजी २’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र त्याआधीच नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे अक्षयने ट्विट शेअर करत, आज तो चिपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अक्षय कुमारने ट्विट शेअर करत चाहत्यांना सांगितले की, “माझा यावर विश्वास बसत नाही आणि नितीन देसाई यांच्या जाण्याने मी खुप दु:खी आहे. नितीन देसाई हे प्रॉडक्शन डिझाईनचे दिग्गज होते. ते सिनेविश्वाचा एक मोठा भाग होते. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ आम्ही आज ‘ओएमजी २’ चा ट्रेलर रिलीज करत नाही. उद्या सकाळी ११ वाजता आम्ही ट्रेलर प्रदर्शित करणार आहोत. ओम शांती.”
अक्षय कुमारने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्याच्या ‘ओएमजी २’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या या निर्णयामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. ‘ओएमजी २’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’देखील एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘ओएमजी २’मध्ये, अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतमी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रायगड पोलिस सध्या नितीन देसाईंच्या आत्महत्येचा तपास करीत आहेत. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचा मृतदेह मुलुंडमधील एका रुग्णालयाच्या शवाघरात ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.