आर्थिक राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थीनीवर टॅक्सी चालकाने अत्याचार केल्याचे उघड झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. छत्तीसगडमध्ये एका विद्यार्थीनीवर तीन शिक्षकांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आल्याने पाकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
16 वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालकाने तरुणीवर हात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणीवर कोणी जादूटोणा केल्याचा बनाव करत टॅक्सी चालकाने तिला पुढील सीटवर बसायला भाग पाडले, त्यानंतर टॅक्सी चालकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नराधम टॅक्सी चालकाचे नाव जगन्नाथ काळे (47) असून याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. या टॅक्सी चालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 आणि 78 सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे.
झारखंडमध्ये काल एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे 40 तुकडे करून जंगलात फेकून दिले. एकामागून एक महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 2022 मध्ये दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वाळकर हत्त्याकांडाची ही पुनरावृत्ती आहे. झारखंडमधील डुमरी जिल्ह्यात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण व पीडिता गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. काही मतभेदांमुळे आरोपीने पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. याआधी बदलापूर येथे शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीवर शाळेतल्याच शिपायाने अत्याचार केला होता.
Edited By- नितीश गाडगे