CCTV Video: शताब्दी रुग्णालयामधून २० दिवसांच्या बाळाची चोरी; खळबळजनक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Shatabdi Hospital: कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलं चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केलीये. तसेच बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केलंय. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
CCTV Video
CCTV VideoSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai:

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक केलीये. तसेच बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केलंय. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

CCTV Video
Mumbai News : अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक, ५५ लाखांचं कोकेन जप्त

कांदिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची 25 दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगा झाला मात्र बाळाचे वजन कमी आणि अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. याच दरम्यान मालवणी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल करत तिच्या वीस दिवसाच्या बाळाची चोरी केली.

मुलाची चोरी करून ती पळून गेली. पळून जातानाची दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीत. मुल चोरी झाल्याप्रकरणी मुलाच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गीते यांनी तपासाला सुरुवात केली.

शताब्दी रुग्णालयातून मुल चोरी करण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी सुरू केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही महिला प्रथम मुलाला मालवणी परिसरात घेऊन गेली होती. महिलेकडे चौकशी केली असता, महिलेचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र तिला मूल होत नव्हते, त्यामुळे ती नाराज होती आणि महिला मुलाला घेऊन पळून गेली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि बाळाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी सांगितले की, ही महिला प्रथम शताब्दी रुग्णालयात गेली आणि तेथे तिने मुलाच्या आईशी याविषयी बोलले. विश्वासात आल्यानंतर आरोपी महिलेने मुलाच्या आईला तोंड धुण्यासाठी पाठवले आणि ती बाळासोबत पळून गेली होती. या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न देखील या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com